पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
पाथर्डीमध्ये महसूल, पोलीस व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेमुळे अनेक वर्षांच्या कालखंडानंतर बारावीचा पहिलाच इंग्लिश विषयाचा पेपर मंगळवारी (दि.11) कॉपीमुक्त वातावरणात पार पडला. या मोहिमेमुळे मात्र केवळ कॉपी करून पास होण्यासाठी आलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली तर बाहेरून कॉपी देता न आल्याने संतप्त झालेल्या तिसगाव येथील एका तरुणाने एका शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली.तर दुसर्या एका शिक्षकाला एका तरुणाने वर्गाच्या बाहेर उभा राहून चाकूचा धाक दाखवला.
तालुक्यात बारावीचे 12 केंद्र असून हमखास पास होण्याची खात्री देणारे अनेक शिक्षणसंस्था चालक असल्याने बाहेरगावाहून हजारो विद्यार्थी सध्या पाथर्डीत दाखल झाले आहेत. मात्र यावेळी शिक्षण विभागाने एका विद्यालयातील शिक्षकांना दुसर्या विद्यालयात नियुक्त केल्याने तसेच महसूल प्रशासनाने प्रत्येक वर्गात असलेल्या शिक्षकाला मोबाईलवर लिंक टाकत वर्गात नेमके काय चालू आहे, हे पाहण्यासाठी मोबाईल चालू ठेवण्यास सांगितल्याने कोणत्या वर्गात काय आहे हे ऑनलाईन पद्धतीने सर्वांनाच पाहता येऊन प्रत्येक वर्गावर वरिष्ठ अधिकार्यांची करडी नजर राहिल्याने वर्गात एकाही विद्यार्थ्याला कॉपी करता आली नाही. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 125 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्राबाहेरून जे तरुण कॉपी पुरवत असायचे त्यांना अटकाव बसला तर शिक्षण विभागाने यावेळी ड्रोनचा वापर केल्याने ड्रोन उडाले की केंद्राबाहेर कॉपी देण्यासाठी उभे राहिलेले तरुण पळ काढत होते.
याशिवाय अनेक केंद्रांच्या आत सीसीटीव्ही यंत्रणा सुद्धा कार्यान्वित केल्याने कॉपी करणार्यांना आळा बसून मंगळवारी एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला नाही. प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवर, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांनी प्रत्येक केंद्राला भेट दिल्याने सर्व यंत्रणा डोळ्यात तेल घालून कार्यरत राहिल्याने आज कॉपीमुक्त वातावरणात पहिला पेपर पार पडला.
बाहेरून कॉपी देता न आल्याने तिसगाव येथे एका ए.के. असे टोपण नाव घेतलेल्या तरुणाने केंद्रसंचालक हेमंत नागरे व सुनील शेटे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून सचिन ढाकणे या शिक्षकाला सुद्धा एका तरुणाने वर्गाच्या बाहेरून चाकूचा धाक दाखवला. गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षकांसह अनिल भवर, श्री तिलोक संस्थेचे सचिव सतीष गुगळे पोलीस स्टेशनला आले होते.
शेवगावमध्ये पहिला पेपर सुरळीत
शहर व तालुक्यात इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सुरळीत पार पडल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी दिली. कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुक्यातील विविध विद्यालयांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षेच्या पहिल्या दिवशी शेवगाव पोलीस पथकाने विविध परीक्षा केंद्राबाहेर विनाकारण उभ्या असलेल्यांना हुसकावून लावले तर काहींना पोलीस ठाण्यात आणून त्यांना समज देऊन सोडून दिले.