मुंबई | Mumbai
लवकरच आयसीसी ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. सर्व चाहते या स्पर्धेसाठी फार उत्सुक आहेत. यंदा ही स्पर्धा पाकिस्तानने आयोजित केलेल्या ‘हायब्रीड मॉडेल’अंतर्गत खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी (दि.14) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. जागतिक क्रिकेट संघटनेने गेल्या वेळेच्या तुलनेत या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत ५३ टक्क्यांनी वाढ केली आहे. एवढेच नाही तर स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला बक्षीस देण्याची योजना आयसीसीने आखली आहे. प्रत्येक मॅचमधील विजेत्यालाही रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षीस दिले जाणार आहे. २०१७ च्या गत हंगामाच्या तुलनेत यावेळी आयसीसीने बक्षीसाची रक्कम अधिक मोठी केल्याचे दिसून येते.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला १९ फेब्रुवारीपासून सुरवात होत आहे. यंदा ही स्पर्धा पाकिस्तान, दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या तीन शहरांमध्ये जसं की लाहोर, रावळपिंडी, कराची तर काही सामने दुबईत होणार आहेत. १९ फेब्रुवारीला कराचीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाला आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध दुबईत खेळणार आहे.
ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजेत्याला २.२५ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १९.४६ कोटी रुपये मिळणार आहे. याचसोबत उपविजेत्या संघाला १.१२ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ९.७६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही टीम्सना समान ५,६०,००० डॉलर (सुमारे ४.८६ कोटी रुपये) मिळणार आहेत.
आयसीसीने यंदाच्या स्पर्धेत ६.९ मिलियन अमेरिकन डॉलर बक्षीस जाहीर केले आहे. २०१७ च्या तुलनेत बक्षिसांच्या रक्कमेत ५३ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. फक्त विजेत्यालाच नाही तर प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण आहे, हे अधोरेखित करण्यासाठी आयसीसने प्रत्येक सामन्यातील विजेत्याला बक्षीसाची घोषणा केली आहे. साखळी फेरीतील विजेत्या संघाला ३४ हजार अमेरिकन डॉलर इतकी रक्कम वेगळी देण्यात येईल. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर राहिलेल्या संघाला प्रत्येकी साडे तीन लाख डॉलर आणि सातव्या आणि आठव्या क्रमांकावरील संघाला १ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर एवढी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.
भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला लीग स्टेज सामना खेळेल. यानंतर, २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियाला सात दिवसांची विश्रांती मिळेल. यानंतर, भारतीय संघ २ मार्च रोजी न्यूझीलंडशी सामना करेल. भारताने शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकला होता, तेव्हा महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. २००२ मध्ये पावसामुळे अंतिम सामना रद्द करण्यात आला. तेव्हा भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते होते. भारतीय संघ एकूण चार वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०१३ आणि २००२ व्यतिरिक्त, हे २००० आणि २०१७ मध्ये घडले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा