नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेनंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा नंबर वन कसोटी गोलंदाज बनला आहे. त्याने भारताचा अनुभवी गोलंदाज आर. अश्विनची जागा घेतली आहे. भारत विरुध्द बांगलादेश कसोटी मालिकेत अश्विनने शानदार गोलंदाजी केली होती, पण बुमराहने देखील त्याला साजेशी खेळी केली. त्यामुळे बुमराहने आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले आहे.
बुमराह अव्वल स्थानी
कानपूर कसोटीत सहा विकेट्स घेत बुमराहने अव्वल स्थान काबीज केले आहे. रविचंद्रन अश्विनला मागे टाकून त्याने दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले. आता बुमराहचे ८७० रेटिंग पॉइंट्स असून तो अश्विनपेक्षा केवळ एका गुणाने पुढे आहे. यादीत टॉप-१० मध्ये रवींद्र जाडेजा ८०९ रेटिंग पॉईंस्टसह सहाव्या स्थानी आहे. बांगलादेशचा मेहदी हसन मिराज चार स्थानांच्या बढतीसह १८व्या स्थानी पोहोचला आहे.
जसप्रीत बुमराह आणि आर. आश्विनने बांगलादेश विरुध्द झालेल्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली आणि प्रत्येकी ११ बळी घेतले. कानपूर कसोटीत बुमराहने ६ आणि अश्विनने ५ बळी घेतले. अश्विनला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आले. ६ विकेट्स घेण्यासोबतच त्याने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते.
श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्या हा सातव्या क्रमाकांवर पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडविरोधात १८ गडी बाद केले होते. त्याने ‘प्लेयर ऑफ द सीरीज’वर देखील नाव कोरले होते. या रँकिंगमध्ये एका पाकिस्तानी गोलंदाजाचा देखील समावेश आहे. जलद गोलंदाज शाहीन अफरीदी ७०९ रेटिंग पॉइंट्सने दहाव्या क्रमांकावर आहे.
यशस्वी जयस्वाल बढती
फलंदाजांच्या यादीत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने दमदार कामगिरी केली आहे. तो २ स्थानांच्या बढतीसह तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याच्या खात्यात आता ७९२ रेटिंग पॉइंट्स आहेत. भारताचा रनमशिन विराट कोहली तब्बल ६ स्थानांची उडी घेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तो बरेच महिन्यांनी टॉप-१० मध्ये आला आहे. विराटचे सध्या ७२४ रेटिंग पॉइंट्स आहेत.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ६९३ अंकांसह पाच स्थानांचे नुकसान झाले आहे. तो १५ व्या क्रमांकावर घसरला आहे. रोहित बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात केवळ ४२ धावा करू शकला. तो गेल्या आठवड्यात टॉप टेनमध्ये होता. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर आला होता, मात्र त्याला फटका बसला आहे. पंत तीन स्थानांनी घसरून नवव्या स्थानावर आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा