मँचेस्टर | वृत्तसंस्था
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने बांग्लादेशवर दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा अधिक बळकट केल्या. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा केला, तर फलंदाजांनी संयमी आणि आक्रमक खेळीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.बांगलादेशच्या संघाने दिलेल्या १३७ धावांचे आव्हान सहज परतवून लावत भारतीय संघाने १९ चेंडू व ५ खेळाडू राखून १३९ धावा करत बांगलादेशचा पराभव केला.
नाणेफेक जिंकून बांग्लादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच बांग्लादेशच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. सलामीवीर दिलारा अख्तरला रेणुका सिंह ठाकूरने अवघ्या 4 धावांवर बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर जुआइरिया फिर्दौस आणि सोभाना मोस्तारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. जुआइरियाने 31 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या, तर कर्णधार निगार सुलतानाने 27 चेंडूंत 32 धावांचे योगदान दिले. सोभाना मोस्तारीने 22 धावा केल्या. अखेरीस बांग्लादेशला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 136 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतीय गोलंदाजांमध्ये राधा यादव हिने सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी करत 4 षटकांत 25 धावा देऊन 3 बळी घेतले. श्री चरणी हिने 20 धावांत 2 बळी मिळवले, तर रेणुका सिंह ठाकूर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे बांग्लादेशला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्री चरणीने या सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावे केला.
137 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघींनी पॉवरप्लेमध्येच बांग्लादेशी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत ३४ चेंडूत ५३ धावा केल्या. तर स्मृती मंधानानेही महत्त्वपूर्ण खेळी साकारत संघाचा डाव स्थिर ठेवला. मधल्या फळीत कर्णधार हरमनप्रीत कौर १३ धावा केल्या तर जेमिमा रॉड्रिग्स यांनी संयमी फलंदाजी करत १५ चेंडूत २६ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतासाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ असा मानला जात होता. मात्र, भारतीय संघाने दडपणाखाली उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. या विजयामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा आणखी बळकट झाल्या असून संघाचा आत्मविश्वासही उंचावला आहे.




