राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या थाटात लग्न लावून दिल्यानंतर महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले. नववधूचे यापूर्वीच लग्न झाले असून, तिला चार मुले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेव व त्याच्या नातेवाइकांनी नववधूसह तिच्या साथीदारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यात घडली.
राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील एका तरुणाला लग्न करायचे असल्याने तो वधूच्या शोधात होता. याचदरम्यान मुंबई येथील एका एजंट महिलेने त्याला एका तरुणीची ओळख करून दिली. लग्न जुळवून देण्याच्या मोबदल्यात एजंट महिलेने नवरदेवाकडून चार लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर सुमारे महिनाभरापूर्वी दोघांचा विवाह लावून देण्यात आला. लग्नानंतर नववधू महिनाभर नवरदेवाच्या घरी राहिली. मात्र, काही दिवसांतच तिचे यापूर्वी लग्न झालेले असून, तिला चार मुले असल्याची बाब उघडकीस आली. तसेच तिला दारू व गुटख्याचे व्यसन असल्याचेही समोर आले. आपली फसवणूक करून चार लाख रुपये उकळण्यात आल्याचे लक्षात येताच नवरदेव व त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दरम्यान, नववधूने आपला व चार मुलांचा सांभाळ करण्याची मागणी केल्याचीही माहिती समोर आली आहे.
या प्रकारानंतर 2 ऑक्टोबर रोजी दुपारी नवरदेव व त्याच्या नातेवाइकांनी नववधूसह तिच्या साथीदारांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या फसवणूक प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे. उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्या टोळ्या सक्रिय असून गेल्या आठवड्यात राहुरी तालुक्यात तीन ते चार तरूणांची मोठी अर्थिक फसवणूक झाली आहे. मात्र समाजात इज्जत जाईल या भितीने अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी देण्याचे टाळले आहे. अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




