येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुक्यातील वाई बोथी (Wai Bothi) स्फोटक साठा प्रकरणी नितीन भास्कर गायकवाड, भगवान सुरेश वाघ आणि शरद आप्पासाहेब भड यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भगवान वाघ याला अटक (Arrested) करण्यात आली असून त्यास येवला न्यायालयाने चार दिवसाची (दि. ५ पर्यंत) पोलिस कोठडी दिली आहे. तर नितीन गायकवाड आणि शरद भड हे दोघे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
वाईबोथी येथे खदाणीच्या कामासाठी कोणतीही शासकीय परवानगी नसताना स्फोटकांचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याचा प्रकार पोलिस छाप्यात (Raid) उघडकीस आला होता. तालुका पोलिसांनी साई मातोश्री स्टोन क्रशर परिसरातून ५ हजार ६५ जिलेटीन कांड्या आणि १ हजार ५९५ व्यावसायिक डिटोनेटर जप्त केले आहे. या कारवाईत १ लाख ४ हजार ५२७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस (Police) शिपाई सचिन हिरामण दराडे यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलिसात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या साठ्यामुळे मानवी जीवितास तसेच परिसराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तालुका पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.




