पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Nashik Agricultural Produce Market Committee) प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील. बाजार समितीच्या विकासासाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करणार असल्याचा निर्धार पत्रकार परिषदेत नवनियुक्त अध्यक्ष गणेश गीते यांनी व्यक्त केला. बाजार समितीच्या कामकाजात राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व देत उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, प्रशासकीय अडचणी दूर करणे आणि बाजार परिसरात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती जाहीर केल्यानंतर शनिवारी (दि. ३) नवनियुक्त मंडळाने अधिकृतपणे पदभार स्वीकारला. बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या हस्ते अध्यक्ष गणेश गीते व सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
हे देखील वाचा : Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी गणेश गितेंची वर्णी; माजी आमदाराची सदस्यपदी निवड
पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे (Kundan Bhole) यांनी सांगितले की, शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नवनियुक्त प्रशासक मंडळाला रीतसर नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. बाजार समितीच्या विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे आणि प्रशासक मंडळाशी समन्वय साधून बाजार समितीचा सर्वांगीण विकास करणे, यासाठी मुख्य प्रशासक म्हणून आपण कार्यरत राहणार आहोत.
दरम्यान, या पदभार ग्रहण सोहळ्याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष गणेश गीते, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, नवनियुक्त सदस्य तथा माजी आमदार बाळासाहेब सानप, सदस्य सचिन ढिकले यांच्यासह बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांजरापोळ आणि बँक खात्यांचा प्रश्न मार्गी
पांजरापोळ जमिनीच्या मुद्द्यासह बाजार समितीसमोरील प्रशासकीय अडचणींबाबत गणेश गीते यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बाजार समितीची दोन अनफ्रीज झालेली खाती पुन्हा सुरू झाली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, शासकीय अंशदान, जीएसटी भरणा, वीज व टेलिफोनची बिले तसेच बाजार परिसरातील स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार आहे.
गटातटाच्या राजकारणाऐवजी विकासावर लक्ष
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती म्हणजे नव्या राजकीय पॅनेलची नांदी आहे का, या प्रश्नावर गीते म्हणाले की, सध्या कोणत्याही गटातटाच्या राजकारणात न पडता बाजार समितीच्या बळकटीकरणावर आणि विकासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. राजकारण आपल्या जागी होत राहील; मात्र सध्याच्या काळात शेतकरी आणि व्यापाऱ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रश्न सोडविणे आणि बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा घडवून आणणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
माझ्या आयुष्यातील चोवीस वर्षाचा राजकीय वनवास आज गीते बंधूमुळे संपुष्टात आला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ही बाजार समितीत मिळालेली संधी शेतकऱ्यांचे हित जोपसण्यासाठी आहे. त्यासाठी काम करू.
सचिन ढिकले, अशासकीय सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक




