Friday, November 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबारामती विमानतळाचा निधी आधी मिळाला असता तर अजित दादांचा अपघात टळला असता...

बारामती विमानतळाचा निधी आधी मिळाला असता तर अजित दादांचा अपघात टळला असता – खा. सुप्रिया सुळे यांची भावूक प्रतिक्रिया

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

बारामती विमानतळाच्या सुधारणा आणि विकासासाठी राज्य सरकारने ६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. मात्र, हा निर्णय घेण्यास सरकारने खूप उशीर केल्याची खंत व्यक्त करत, जर हा ६४ कोटी रुपयांचा निधी अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी मंजूर झाला असता, तर कदाचित तो अपघात टळला असता आणि दादा आज आपल्यात असते, अशी अत्यंत भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली असताना, गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर शिवसेना कालही उद्धव ठाकरेंचीच होती आणि उद्याही राहील, असा ठाम विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांची नावे वगळण्याचे अर्ज केले जात असल्याची एक ऑडिओ-व्हिडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे. या गंभीर प्रकारावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सदर क्लिप तातडीने मागवून घेऊन ती सखोल चौकशीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी हेच सक्षम प्राधिकारी असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या मूळ रहिवाशांची नावे मतदार यादीतून परस्पर कट करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, याआधी पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेच्या धर्तीवर इंदापूर प्रकरणातही दोषींवर तात्काळ पोलीस गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यात सध्या बिकट दुष्काळी परिस्थिती असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कर्जवसुलीच्या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. अशा कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून, राज्य सरकारने हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने वसुली करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर येत असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये विद्या प्रतिष्ठानमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रक्रल्पाचा विकास, नवीन इमारतीची उभारणी आणि अमेरिकेतील हार्वर्ड व स्टॅनफर्ड यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत केल्या जाणाऱ्या सामंजस्य करारांवर (एमओयू) सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी दौऱ्याची तारीख निश्चित झाली होती. मात्र, त्या काळात शरद पवार यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यामुळे पवार साहेबांची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतरच हा दौरा आयोजित करावा, अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) करण्यात आली होती.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी बारामती प्रशासकीय भवनात प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकर, चारा डेपो, चारा छावण्यांची आवश्यकता तसेच काच्या वाडीसह इतर भागांतील भूसंपादन व जमीन फेरमोजणीच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

ताज्या बातम्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
मुंबई / प्रतिनिधी राज्य सरकारने शुक्रवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची बदली...