मुंबई | प्रतिनिधी Mumbai
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजनेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीत राज्यातील १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा समावेश असून, संबंधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या दोन लाख रुपयांवरील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत भरावी लागणार आहे. या मुदतीत रक्कम भरणाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन टप्पे समाविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली. त्याअंतर्गत २४ जुलै, ११ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर २०२६ रोजी एकूण २५ लाख ८१ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आतापर्यंत १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.
आता योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओटीएसची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पात्र १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची यादी आज आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित याद्या बँकांच्या शाखा, विकास संस्थांच्या कार्यालयांमध्ये तसेच ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ओटीएसनुसार दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी लागणार आहे. एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कोणत्याही एका कर्जखात्यात स्वतःच्या हिश्श्याची रक्कम जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, संबंधित खात्यात ओटीएसनुसार देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे, त्यांनाच आधार प्रमाणीकरणाची सुविधा मिळणार आहे. आधार प्रमाणीकरण आणि इतर पात्रता निकष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन लाख रुपयांचा लाभ हस्तांतरित केला जाईल. शासनाकडून ही रक्कम कर्जखात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचे कर्जमुक्तीचे प्रकरण पूर्ण होणार आहे.
विभागनिहाय पात्र शेतकऱ्यांची संख्या
नाशिक विभाग : ४८ हजार ३७९
पुणे विभाग : ४० हजार ९४६
छत्रपती संभाजीनगर विभाग : ३९ हजार ५९७
अमरावती विभाग : २५ हजार ९१७
नागपूर विभाग : १२ हजार २
कोकण विभाग : २ हजार ९७९
एकूण : १ लाख ६९ हजार ८२०
‘शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायमचे हलके करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने कर्जमुक्ती योजना टप्प्याटप्याने राबवली जात आहे. तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी या योजनेपासून अलिप्त राहू नये याची सहकार विभाग पूर्णपणे काळजी घेत आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावरील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा’
बाबासाहेब पाटील; सहकार मंत्री




