Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंविरोधात बोलल्याने धमक्या, महिलेकडून पोलिसांत तक्रार; थेट...

मनोज जरांगेंविरोधात बोलल्याने धमक्या, महिलेकडून पोलिसांत तक्रार; थेट…

जालना । Jalna

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला सातत्याने घेरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. अंतरवाली सराटीतील २० दिवसांच्या उपोषण स्थगितीनंतर जरांगेंचे सहकारी एकामागून एक वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. सहकाऱ्यांची प्राप्तिकर (IT) चौकशी आणि कोर कमिटीतील सदस्यावर बेकायदेशीर वाळू उपसाप्रकरणी झालेली कारवाई ताजी असतानाच, आता एकेकाळी आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी थेट अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

ललिता तारख यांनी सोशल मीडियावर आपल्याविरोधात अश्लील शिवीगाळ, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) निर्मित आपत्तीजनक फोटो-व्हिडिओ बनवून बदनामी करणे आणि धमक्या दिल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. “एवढे दिवस मी त्यांच्या बाजूने बोलत होते तर त्यांच्यासाठी चांगले होते, पण आज सत्य बोलल्यावर माझ्यावर चिखलफेक केली जात आहे,” असा संताप व्यक्त करत त्यांनी विरोधकांना थेट सवाल केला.

माध्यमांशी बोलताना ललिता तारख म्हणाल्या, “सोशल मीडियावर माझी सातत्याने बदनामी केली जात आहे. मी पैसे घेतले, मला लाखांचे पॅकेज मिळाले किंवा प्लॉट घेतला का, असे प्रश्न विचारून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना नम्र विनंती आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. वर्ष २०२३ पासून माझ्यासह मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय चौकशी करावी; म्हणजे नक्की कोणाची संपत्ती वाढली हे स्पष्ट होईल.”

“टीका करणाऱ्यांनी घरात आई-बहीण आहे याचे भान ठेवून बोलावे. मी अजूनही संयम बाळगून आहे, पण वेळ आल्यावर सर्व सत्य बाहेर आणेन. मला बोलायला लावू नका,” असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे. माजी सहकाऱ्यानेच घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि संपत्तीच्या चौकशीच्या मागणीमुळे मराठा आंदोलनाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून मनोज जरांगेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या