Sunday, June 7, 2026
HomeनगरShrirampur : अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी एका मेडिकल चालकास अटक

Shrirampur : अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी एका मेडिकल चालकास अटक

आतापर्यंत 6 डॉक्टरांसह 19 आरोपी जेरबंद || पाच सोनोग्राफी मशीन जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील आणखी एका मेडिकल चालकास पोलिसांनी अटक केली आहे.आतापर्यंत 6 डॉक्टरांसह 19 आरोपी जेरबंद करण्यात आले असून यात पाच सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील जालिंदर रामदास बोरुडे (वय 40) असे ताब्यात घेतलेल्या मेडिकल चालकाचे नाव असून त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीन आणि क्रेटा चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात सुरुवातीला नेवासा येथील डॉ.भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा एकूण 9 जणांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त केली होती. त्यानंतरच्या तपासात ढगे नामक आरोपीकडून आणखी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले तसेच अनेक एजंटांनाही अटक करण्यात आली. तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी श्रीरामपूर येथील डॉ. कुटे आणि डॉ. शेख यांनाही लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणात अटक केली. पुढील तपासात पुणे येथील दोन डॉक्टर आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणार्‍या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तसेच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे यालाही आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे मशीन जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान पुण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील डॉ.कुणाल वलटे याने बेकायदेशीररित्या सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने डॉ. वलटे आणि स्थानिक मेडिकल चालक सागर उन्हाळ यांना अटक केली. दरम्यान, पुणे येथून अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्य पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एका मेडिकल चालकाचा शोध सुरू होता.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून फरार असलेला जालिंदर बोरुडे हा नगर तालुक्यातील हातवळण गावाच्या शिवारातील स्वतःच्या शेतातील झोपडीत लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर येथील विशेष पथकाने कारवाई करून बोरुडे याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील क्रेटा वाहनातून अवैध गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 19 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सहा डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि एक मोठा वैद्यकीय साहित्य पुरवठादार यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे तपासादरम्यान विविध जिल्ह्यांतून अवैध गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारी एकूण पाच सोनोग्राफी मशीन आणि चार चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल महादेव कोहक आणि संदीप राऊत यांनी परिश्रम घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी श्री.भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.आठरे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोल्हे कारखान्याची 3.87 कोटीची कररक्कम परस्पर वळविली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य वस्तू व सेवाकर विभागाच्या संगणकीय प्रणालीतील करभरणा चलनांमध्ये कथितरीत्या अनधिकृत फेरफार करून शासनाच्या तब्बल तीन कोटी 87 लाख 11 हजार 859...