Tuesday, November 17, 2026
Homeक्राईम​Nashik Crime News : सिंहस्थापूर्वीच सायबर चाेरांचे 'डिजिटल जाळे'; प्राधिकरणाचे फेक अकाऊंट...

​Nashik Crime News : सिंहस्थापूर्वीच सायबर चाेरांचे ‘डिजिटल जाळे’; प्राधिकरणाचे फेक अकाऊंट तयार करून दिशाभूल करण्याचा डाव

सलग चार महिने सुरू होता प्रकार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थाच्या (Simhastha Kumbhmela) निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये (Nashik-Trimbakeshwar) देश-विदेशातून लाखो भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता, या सोहळ्याच्या आडून नागरिक आणि भाविकांना लुटण्यासाठी सायबर चाेरट्यांनी आत्तापासूनच डिजिटल जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. 

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी कुंभमेळ्याच्या कामांचे बनावट वर्कऑर्डर काढून फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले असतानाच, आता थेट नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे हुबेहूब भासणारे बनावट (फेक) इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्याद्वारे दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल चार महिने सुरू असलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रशासकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे.

सायबर पोलिसांनी (Cyber Police) दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या सलग चार महिन्यांच्या कालावधीत अज्ञात सायबर गुन्हेगाराने इंटरनेटच्या माध्यमातून हा प्रकार केला. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा आणि प्राधिकरणाचे अधिकृत खाते असल्याचा भास व्हावा, या उद्देशाने आरोपीने इन्स्टाग्रामवर ‘ऑफिशिअल कुंभनगरी_नाशिक’ या नावाने बनावट यूजरनेम तयार केले. या खात्यावरून कुंभमेळा प्राधिकरणाबाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली.

या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपायुक्तांच्या परवानगीने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्यातील (Cyber Police Station) पोलीस शिपाई दर्शन सूर्यकांत सोनवणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या (आयटी ॲक्ट) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​तांत्रिक तपासाची चक्रे वेगवान

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा समाजकंटकांकडून भविष्यात भाविकांची आर्थिक फसवणूक किंवा मोठी दिशाभूल होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या बनावट खात्याचा मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

प्रशासनाला समांतर यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न?

कुंभमेळ्याचे नियोजन अद्याप सुरू असतानाच, कधी बनावट वर्कऑर्डर तर कधी प्राधिकरणाच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करून सायबर चोरटे प्रशासनाला समांतर यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. भाविकांची गर्दी आणि सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेता, अधिकृत माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासकीय पातळीवरून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या