नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय अखेर शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या नियमित महासभेत मार्गी लागणार आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या या सभेत महापौर हिमगौरी आहेर आडके स्वीकृत सदस्यांच्या नावांची औपचारिक घोषणा करणार आहेत. नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या घोषणेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांच्या दहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला सहा, शिवसेना शिंदे गटाला दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत. या जागांसाठी संबंधित पक्षांकडून नावे सादर करण्यात आली असून, अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर दहा अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे महासभेत या नियुक्त्याांची घोषणा होणार आहे.
स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून यापूर्वी अकराव्या अर्जाचा मुद्दा उपस्थित झाला होता. काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी स्वतंत्र गटाच्या मान्यतेचा प्रश्न असतानाही स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावरून बरीच चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेसचा स्वतंत्र गट नसल्याने आयुक्त मनीषा खत्री यांनी जीन यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे दहा जागांसाठी दहा वैध अर्जच अंतिम राहिले आहेत.
“मी गर्लफ्रेंडला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो जिथे…”! राहुल गांधींनी खास किस्सा शेअर केला
महासभेच्या विषयपत्रिकेत सदस्यांच्या स्वीकृत नियुक्तीबरोबरच शहरातील विविध भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण, वीजखांब व केबल बदलणे, सभागृह बांधकाम, भूसंपादन आणि इतर विकासकामांचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विविध प्रभागांतील रस्त्यांची कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मागण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव महासभेत सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छतागृहे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा विषय आहे. वडाळा शिवारातील ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्याने बाधित होणारे क्षेत्र संपादित करणे, तसेच मागासवर्गीय कल्याणकारी योजनांच्या अनुशेष आणि वाढीव निधीला मान्यता देण्याचे प्रस्तावही चर्चेसाठी येणार आहेत.
महाकवी कालिदास कलामंदिर, पं. पलुस्कर सभागृह, नाट्यगृह आणि फाळके स्मारक येथील कामकाजासाठी सेवानिवृत्त कम ‘चाऱ्यांना मानधनावर मुदतवाढ आणि मानधनवाढ देण्याचे प्रस्तावही महासभेपुढे ठेवण्यात आले आहेत.




