अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेली, मध्य प्रदेशात विक्रीसाठी असलेली विदेशी दारू वाहून नेणारा 10 चाकी कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नांदगाव शिवारात (ता. अहिल्यानगर) पकडला. या कारवाईत दारूच्या 1 हजार 250 बॉक्ससह कंटेनर असा एकूण अंदाजे एक कोटी 72 लाख 42 हजार 960 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी कंटेनरचालक मुस्तकीम मुंशी खान (रा. धारड, ता. रतलाम, जि. रतलाम, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुरज कुसळे यांना अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल जयविजयसमोर, नांदगाव शिवारात विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक कुसळे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘ब’ विभागाचे निरीक्षक बाबुराव घुगे यांच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित 10 चाकी कंटेनर (क्र. आरजे 32 जीई 3013) थांबवून दोन पंचांसमक्ष त्याची झडती घेण्यात आली. या तपासणीत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार, तसेच अहिल्यानगरचे अधीक्षक नितीन घुले व उपअधीक्षक प्रविणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक कुसळे, ‘ब’ विभागाचे निरीक्षक घुगे, दुय्यम निरीक्षक ए. एन. जावळे, व्ही. जी. चव्हाण, जवान सुरज पवार, सुनील निमसे, चतुर पाटोळे, दिनेश खैरे, सिध्दांत गिरीगोसावी, प्रथमेश पंडीत, श्रीकृष्ण घुले, अर्चना दहिफळे, पांडुरंग गदादे, निहाल शेख, सुनंदा अकोलकर यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
तीन प्रकारच्या व्हिस्कीच्या बाटल्या
जप्त केलेल्या मद्यसाठ्यात 750 मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या 7 हजार 632 बाटल्या (636 बॉक्स), 180 मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या 14 हजार बाटल्या (280 बॉक्स) आणि 180 मिलीच्या बॅगपायपर व्हिस्कीच्या 16 हजार 32 बाटल्या (334 बॉक्स) यांचा समावेश आहे. अशा एकूण 37 हजार 664 सिलबंद बाटल्या आणि 1 हजार 250 बॉक्समधील मद्य कंटेनरसह जप्त करण्यात आले.




