राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुरूम वाहतूक करणारा विनानंबरचा डंपर अडवून कारवाई करण्याचा प्रयत्न करणार्या परिविक्षाधीन प्रांताधिकारी विनीत शिर्के यांच्यावर हल्ला करून त्यांना डंपरच्या चाकाखाली ढकलल्याची धक्कादायक घटना 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पिंपळगाव फुणगी शिवारात घडली. डंपर चालकानेही त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. प्रसंगावधान राखत शिर्के यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर संशयितांनी मुरूमाने भरलेला डंपर घेऊन पलायन केले. या प्रकरणी डंपर चालकासह आठ जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिविक्षाधीन प्रांताधिकारी विनीत विक्रांत शिर्के (वय 32) हे 27 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मालुंजा येथे प्रवरा नदीपात्रातील अधिकृत वाळू लिलावाच्या दप्तराची तपासणी करण्यासाठी गेले होते. तपासणी आटोपून ते लाख-जातप मार्गे चिंचोलीकडे जात असताना पिंपळगाव फुणगी शिवारात त्यांना विनानंबरचा डंपर मुरूम वाहतूक करताना दिसला. अवैध मुरूम वाहतुकीचा संशय आल्याने शिर्के यांनी डंपर अडवला. त्यानंतर ते स्वतः डंपरमध्ये बसले आणि चालक धनराज चौधरी याला डंपर राहुरी तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. मात्र, डंपर काही अंतर पुढे गेल्यानंतर मोटारसायकलीवरून आलेल्या सहा अनोळखी व्यक्तींनी डंपरचा पाठलाग केला. त्यांनी डंपरला ओव्हरटेक करून मोटारसायकली आडव्या लावल्या आणि वाहन रोखले.
यानंतर संबंधितांनी शिर्के यांना धक्काबुक्की करत डंपरमधून खाली ओढले. एवढ्यावरच न थांबता त्यांना डंपरच्या पुढील चाकाखाली ढकलून दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्याचवेळी डंपर चालकाने शिर्के यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिर्के यांनी तातडीने रस्त्याच्या कडेला उडी मारली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. शिर्के यांना खाली ढकल्यानंतर संशयितांनी मुरूमाने भरलेला डंपर घेऊन तेथून पळ काढला. त्यानंतर शिर्के आणि त्यांचे वाहनचालक प्रवीण खरमाळे यांनी डंपरचा सुमारे 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. मात्र, संशयित डंपरसह पसार होण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई करताना महसूल अधिकार्यांना थेट जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय कर्तव्य बजावणार्या अधिकार्याला अशा प्रकारे लक्ष्य केल्याच्या आरोपामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर परिविक्षाधीन प्रांताधिकारीविनीत विक्रांत शिर्के यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार डंपर चालक धनराज चौधरी, डंपर मालक दीपक ऊर्फ प्रवीण बबन लाटे (रा. चिंचोली, ता. राहुरी) आणि सहा अनोळखी व्यक्ती, अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 1202/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 132, 115(2), 189(2), 191(1), 190, 191(2), 191(3), 281 आणि 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करीत असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.




