गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री आणि जुगाराविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी धडक कारवाई केली. दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्रीचे पाच, तर जुगाराचा एक असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्या, गावठी हातभट्टीची दारू आणि रोख रक्कम असा एकूण 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पहिली कारवाई सकाळी 12.30 वाजता बर्हाणपूर गावात करण्यात आली. यावेळी ताराबाई छगन बर्डे यांच्या घराच्या पाठीमागे धान्य दुकानाजवळ प्लास्टिक ड्रममध्ये विक्रीसाठी ठेवलेली 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. अंदाजे तीन हजार रुपये किमतीची ही दारू जप्त करण्यात आली.
दुसरी कारवाई दुपारी 1.20 वाजता घोडेगाव ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील शिवांजली सर्कलजवळ करण्यात आली. यावेळी बबलू अशोक कसबे याच्याकडून देशी दारूच्या 180 मिलीच्या 21 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत 1 हजार 680 रुपये असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
तिसरी कारवाई दुपारी 2.10 वाजता वडाळा बहिरोबा येथे तलाठी कार्यालयाजवळ करण्यात आली. यावेळी श्याम अशोक तेलतुंबडे हा अवैध देशी दारू विक्री करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून 180 मिलीच्या 20 बाटल्या, अंदाजे 1 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपी फरार असल्याची नोंद आहे.
चौथी कारवाई दुपारी 3.10 वाजता वडाळा बहिरोबा परिसरातील कारेगाव रोडलगत करण्यात आली. यावेळी कैलास मोतीलाल गायकवाड याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. जुगार खेळताना त्याच्याकडून 1 हजार 550 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. पाचवी कारवाई सायंकाळी 4.10 वाजता रास्तापूर गावात करण्यात आली. यावेळी शाम आण्णासाहेब नामदेव भाकड याच्याकडून देशी बॉबी संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 22 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत 1 हजार 760 रुपये असल्याचे नमूद आहे.
सहावी कारवाई सायंकाळी 5.05 वाजता फत्तेपूर गावातील हॉटेल उदयन परिसरात करण्यात आली. यावेळी गोरख चंद्रकांत धुमाळ याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी दारूच्या एकूण 64 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत 8 हजार 415 रुपये असल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे. या सर्व प्रकरणांत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार किशोर शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 (ई) नुसार पाच गुन्हे, तर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अहील्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस सहायक फौजदार डी. एम. माळवे करीत आहेत.




