नाशिक | प्रतिनिधी Nashik
सातपूरच्या मळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रपाळी करून घरी परतणारे कामगार, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या आक्रमक कुत्र्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. नंदिनी नदीलगत सातपूर मळे विभागातील जुन्या अंबड रोडवर शिकवणी वरून घरी परतणाऱ्या अवघ्या पाच वर्षीय चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात जास्मिन सुभाष पाडवी ही चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर कराड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
जास्मिन ही जनता विद्यालय, सातपूर येथे सीनियर केजीमध्ये शिक्षण घेत आहे. शिकवणी संपवून घरी जात असताना अचानक कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर हल्ला केला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जास्मिनचे आई-वडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे मुलीच्या उपचारांचा आर्थिक भार पेलताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने जखमी चिमुरडीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विवेक सोनवणे आणि सुनील मौले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मनपाचे विभागीय अधिकारी राजभोज, पशुसंवर्धन अधिकारी प्रमोद सोनवणे आणि मनोज निगळ यांनी तातडीने कारवाई करत परिसरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, मळे परिसरात मोकाट जनावरांसह कुत्र्यांचा प्रश्न सातत्याने गंभीर बनत चालला आहे. रस्त्याच्या कडेला उघड्यावर विक्री होणारे मांस आणि मांसाहारी पदार्थांचे अवशेष यामुळे कुत्र्यांचा वावर वाढत असून, ते अधिक आक्रमक होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांच्या मागे कुत्र्यांचे कळप धावणे, तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांवर अचानक एकत्रित हल्ला करणे, असे प्रकार वारंवार घडत आहेत.
चिमुरडीच्या हल्ल्यानंतर नागरिकांचा संताप
सातपूर मळे परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुले त्रस्त झाली आहेत. दररोज जीव मुठीत धरून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. एका पाच वर्षीय चिमुरडीवर झालेल्या हल्ल्याने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महापालिकेने केवळ तात्पुरती पकडमोहीम न राबवता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच जखमी जास्मिन पाडवी हिच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.




