Monday, May 4, 2026
Homeक्राईमSangamner : अवैध वाळू वाहतुकीवर घारगाव पोलिसांची धडक कारवाई

Sangamner : अवैध वाळू वाहतुकीवर घारगाव पोलिसांची धडक कारवाई

7 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त || चालकासह दोघांवर गुन्हा

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या पठारभागात अवैध वाळू तस्करीने अक्षरशः उच्छाद मांडल्याचे चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर घारगाव पोलिसांनी साकूर गावाच्या शिवारात मोठी कारवाई करत सुमारे 7 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवारी (दि.29) पहाटे साडेचारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या धडाकेबाज कारवाईमुळे अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साकूर ते जांबूत मार्गावरील दिघी केटीवेअर परिसरात एका पिवळ्या रंगाच्या ट्रकमधून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष बोडखे व प्रमोद गाडेकर यांनी पंचांसह घटनास्थळी सापळा रचला. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास संशयित ट्रक येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये दोन ब्रास वाळू आढळून आली. मात्र, चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी पोलिसांनी चालक किरण भाऊसाहेब टेकुडे (वय 37, रा. टेकडवाडी, ता. पारनेर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ही वाळू भास्कर खंडू मेंगाळ (रा. जांबूत बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्या सांगण्यावरून मुळा नदी पात्रातून भरून आणत असल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 12 हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू आणि सुमारे 7 लाख रुपये किंमतीचा ट्रक (क्र. एमएच. 16, सीडी.6884) असा एकूण 7 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.

अकलापूर परिसरातही वाळू उपसा सुरूच…
अकलापूरच्या शेळकेवाडी परिसरातूनही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती समोर येत आहे. मुळा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असून, याकडे स्थानिक महसूल विभाग व रात्रगस्त पथक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर घारगाव पोलिसांनी शेळकेवाडी परिसरातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

बिचुकले

Baramati ByPoll Election 2026: बारामतीत बिचुकले, करुणा शर्मांच्या एकुण मतांपेक्षा ‘नोटा’...

0
बारामती | Baramatiदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे....