धुळे Dhule। प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात गणरायाला निरोप (Ganaraya Immersion) देण्यासाठी तयारी पुर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे 350 सार्वजनिक मंडळांकडून मूर्ती विसर्जन करण्यात येणार आहे. तर शहरात विसर्जनाची तयारी महापालिका (Municipal) व पोलिस प्रशासनातर्फे (police administration)पुर्ण झाली आहे. एकुण 37 ठिकाणी विर्सजनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मूर्ती, निर्माल्य संकलनही करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेतर्फे 166 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनामुळे मिरवणुकीला मात्र बंदी घालण्यात आली आहे. रात्री 10 वाजेपर्यंत गणपती विसर्जनाला परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करून 380 मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात रोषणाईने झळाळणारे चौक यंदा सुनेसुने दिसून आले. शहरात पहिल्या टप्प्यात दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यानंतर मंगळवारी पाचव्या दिवशी 10 मंडळांनी गणेशमूर्तीचे विसर्जन केले. त्यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील सात मंडळांचा समावेश होता. तर आता शेवटच्या टप्प्यात अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात येणार आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
कोरोनामुळे यंदा विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. विसर्जन मिरवणुकीसह वाद्य वाजवण्यास परवानगी नाही. तसेच घरगुती व खासगी, सार्वजनिक मंडळांना रात्री दहा वाजेपर्यंत विसर्जनासाठी वेळ देण्यात आला आहे. शहरात एकुण 37 ठिकाणी विजर्सनासाठी सोय करण्यात येणार आहे. पाण्याने भरलेले हौद मूर्ती विसर्जनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच मूर्ती व निर्माल्य संकलनाची सोयही करण्यात आली आहे.
तर हत्तीडोह येथे विशेष व्यवस्था करण्यात आली असून हत्तीडोह परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. व प्रखर विद्युत झोताची व्यवस्था करण्यात आली आहे. डेडरगाव, नकाणे व एमआयडीसी तलावात गणेशमूर्तींचे विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. तेथे महापालिकेचे कर्मचारी पहारा देण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
166 कर्मचारी नियुक्त- गणरायाच्या विसर्जनाच्या दिवशी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जन स्थळी गणेशमूर्ती संकलनासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विसर्जन स्थळी महापालिकेचे कर्मचारी तैनात राहतील. त्यासाठी एकूण 166 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मूर्ती संकलनासाठी 21 बसेस
अनंत चतुर्दशीला अनेक भाविक जलप्रदुषण होवू नये म्हणून मूर्ती दान करतात किंवा कृत्रिम हौदात मूर्तीचे विसर्जन करतात. त्यानंतर महापालिकेतर्फे विधिवत सर्व मूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जनस्थळी जमा झालेल्या मूर्ती वाहून नेण्यासाठी महापालिकेने एसटी महामंडळाच्या 21 बसेसची व्यवस्था केली आहे.
...तर मंडळांवर कारवाई होईल
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोविडमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी शासनाने नियमावली तयार करुन दिली आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास त्या मंडळावर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस यंत्रणेने दिला आहे.




