नाशिक |प्रतिनिधी| Nashik
व्यवसायाने फार्मासिस्ट अर्थात औषधनिर्माता असलेला तरुण आता मेफेड्रोन तस्करीत सक्रीय असल्याची धक्कादायक बाब नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) काठेगल्ली सिग्नल परिसरातून उघड केली आहे. मध्यरात्री पथकाने सापळा रचून 6.5 ग्रॅम मेफेड्रोनसह (एमडी) चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी एकजण औषधनिर्माता असून, दुसरा मार्केटिंग व्यवसायात कार्यरत आहे. त्यांनी श्रीरामपूरमधून एमडी आणले असून, मुंबई नाका पोलिसांत सात जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
एनडीपीएसचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिसांत संशयित फैज शब्बीर शेख (वय 22, रा. पखालरोड), कार्तिक भगवान दांदडे (23, रा. द्वारका), अदनान नूरकलाम खाटीक (21, रा. पखालरोड), ताजुद्दीन मोहम्मद रिजवान राईन (20, रा. सात्विकनगर), अदनान अन्सारी, शादाब (रा. वडाळा, नाशिक), सोहेल जुबेर शेख (रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नांद्रे यांना मिळालेली गोपनीय माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना कळविण्यात आली.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, अंमलदार बळवंत कोल्हे, संतोष सौंदाणे, चंद्रकांत बागडे, योगेश सानप, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांनी सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले. गुरुवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता पथकाने काठेगल्ली सिग्नलजवळील परिसरात सापळा रचला. मुख्य संशयितासह तीन साथीदार आले असता पथकाने चारही बाजूने सापळा रचून संशयितांना अटकाव केला. पंचांसमक्ष फैजची अंगझडती घेतल्यावर एमडी पावडर आढळली. यासह दांदडे, खाटीक व ताजुद्दीनची अंगझडती घेत पथकाने महागडे मोबाइल जप्त केले. शुक्रवारी (दि. 7) पहाटे उशिरापर्यंत पंचनामासह कारवाई सुरू राहिल्यानंतर मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
हस्तगत मुद्देमाल
– 32 हजार पाचशे रुपयांचे 6.5 ग्रॅम मॅफेड्रोन
– प्रत्येकी 50 हजारांचे दोन महागडे मोबाईल
– 35 हजार व 25 हजारांचे दोन मोबाईल
– पाचशे रुपये रोख रक्कम, 1 लाख 93 हजारांचा एकूण मुद्देमाल
– संशयित फैज फार्मासिस्ट; खाटीक हा मार्केटिंग करतो
– संशयित दांदडेचा अंडारोल व्यावसायिक
आता ‘श्रीरामपूर कनेक्शन’
फैज याची चौकशी केल्यानंतर त्याने वडाळ्यातील अदनान व शादाब यांच्यासोबत श्रीरामपूरमध्ये जाऊन सोहेल शेख याच्याकडून एमडी ड्रग्ज खरेदी केल्याचे सांगितले. फैज व त्याच्या साथीदारांचा नाशिकमध्ये एमडी विक्रीचा डाव होता. यापूर्वी मुंबई, भिवंडी, ठाणे, मालेगाव, सोलापूरमार्गे नाशिकमध्ये एमडी पोहोचल्याचे एनडीपीएसच्या तपासात उघड झाले होते. आता श्रीरामपूरमधूनही अमली पदार्थ येत असल्याने हे ‘कलेक्शन’ शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.




