दिल्ली । वृत्तसंस्था Delhi
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटनझाले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातील ख्यातनाम साहित्यिकांसह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे आज एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. तसेच त्यांनी स्वत:च्या हातानं बाटलीमधील पाणी शरद पवार यांच्यासमोर ठेवलेल्या ग्लासामध्ये त्यांना पिण्यासाठी ओतलं.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज दिल्लीमध्ये मराठी भाषेचा हा गौरवशाली कार्यक्रम आयोजित होत आहे. काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे.
भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. तर भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते. केसरी आणि मराठा सारख्या वृत्तपत्रांनी, गोविंदाग्रजांच्या कविता, राम गणेश गडकरींचे नाटक यातून राष्ट्रप्रेमाची धारा निघाली. त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा मिळाली. सामाजिक मुक्तीचे द्वार उघडण्याचं काम मराठी भाषेनं केलं, असं यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार म्हणाले की, हे संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले, याचा मला मनापासून आनंद आहे. महाराष्ट्र शासन, साहित्यिक आणि रसिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरवठा केला. या दर्जा मिळवण्यासाठी नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले. जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतं आहे. मी निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी होकार देण्यासाठी एक मिनीटही घेतला नाही.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ,मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसी, ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली.
स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये १७३७ मध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होते, आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा होऊन, लोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली.
संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. कला, साहित्य, संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात, त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून १०० वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री.फडणवीस म्हणाले.
डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत रहाते.
महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते. या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या संमेलनात राज्यभरातील ख्यातनाम साहित्यिकांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, सुशील कुमार शिंदे, मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.