Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुरगाणा तालुक्यात पावसाची संततधार; जनजीवन विस्कळीत

सुरगाणा तालुक्यात पावसाची संततधार; जनजीवन विस्कळीत

पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी; फरशी पुलांवरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प

- Advertisement -

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

तातापाणी येथील गरम पाण्याचे झरे तसेच साखळचोंड धबधबा परिसरात पर्यटकांना जाण्यास वनविभागाच्या उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. भिवतास धबधबा येथे बाऱ्हे पोलिस ठाणे व वन समितीकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हतगड किल्ल्यावर जाण्यासही ग्रामपंचायतीने मज्जाव केला आहे.

गेल्या १७ ते १८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नार, पार, गिरणा, अंबिका, तान, मान, कावेरी आणि वाझडी या नद्यांना महापूर आला असून त्या धोक्याची पातळी ओलांडून दुथडी भरून वाहत आहेत.

तालुक्यातील अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या जीर्ण फरशी पुलांवरून आणि पाईप मोऱ्यांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे .

कवेली–मनखेड मार्गावर झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. तसेच पिंपळसोंड, कुकूडणे, बोरचोंड, खोकरी, उंबरपाडा, पांगारणे, नटवरपाडा, आंबेपाडा, मनखेड आदी भागांतील फरशी पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गावांचा संपर्क १५ ते २० तासांहून अधिक काळ तुटलेला आहे.

दरम्यान, तालुक्यात आजपर्यंत ४३५ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या १५ तासांत १५०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच पूरग्रस्त भाग, नद्या व धबधब्यांच्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : समृद्धी महामार्गावरील चाकूच्या धाकाचा दरोडा उघडकीस

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon समृद्धी महामार्गावर आयशर वाहन दुरुस्त करणार्‍या मेकॅनिक व त्याच्या साथीदारांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटणार्‍या टोळीचा...