Monday, August 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग; बेटावर अडकलेल्या १८ तरुणांची सुखरूप सुटका

नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग; बेटावर अडकलेल्या १८ तरुणांची सुखरूप सुटका

- Advertisement -

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून सोमवारी दुपारी चारनंतर आठ वक्राकार दरवाजांतून ५५ हजार ९२८ क्यूसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

दरम्यान, धरणासमोरील बेटावरील महादेव मंदिर परिसरात खानगाव थडी येथील १८ आदिवासी तरुण मासेमारीसाठी गेले असताना नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली आणि ते बेटावर अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ धरणातील पाण्याचा विसर्ग काही काळासाठी बंद केला. त्यानंतर बचाव पथकाने सर्व १८ तरुणांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

यापूर्वी धरणाच्या चार वक्राकार दरवाजांतून १५ हजार २५८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, करंजगाव, शिंगवे तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांत सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणातून एकूण ०.८० टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात, पुलांवर किंवा नदीकाठी अनावश्यक वर्दळ टाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक विस्तारावर भर; २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यस्तरीय चिंतन शिबिर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)संघटनात्मक विस्तारासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या पक्षाकडे लोकसभेतील १ खासदार आणि विधानसभेतील ४१ आमदार...