Sunday, September 6, 2026
HomeनगरCrime News : फेसबुकवरील ओळखीच्या वादातून एकाची धारदार शस्त्राने हत्या

Crime News : फेसबुकवरील ओळखीच्या वादातून एकाची धारदार शस्त्राने हत्या

आळेफाटा |वार्ताहर| Alephata

- Advertisement -

सोशल मीडियावरील (Social Media) ओळखीमधून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर (Junnar) तालुक्यातील आणे (Anne) येथे एका विवाहितेच्या पतीची धारदार शस्त्राने हत्या (Murder) झाल्याची घटना बुधवारी (8 जुलै) पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाते कुटुंबीय नेहमीप्रमाणे पहाटे घराशेजारील गोठ्यातील कामात व्यस्त होते. सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास तुषार दाते हे घरामागील शेतातून गाईंसाठी चारा आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला (Weapon Attack) करण्यात आला. त्यांच्या आरडाओरडीनंतर पत्नी सविता दाते घटनास्थळी धावून गेल्या असता हल्लेखोर तुषार दाते यांच्यावर वार करत असल्याचे त्यांनी पाहिले.

पतीला वाचविण्याचा प्रयत्न करताना सविता दाते यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न आरोपीने केला. त्यांनी घराकडे धाव घेतल्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी आल्याने आरोपी तेथून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेतील तुषार दाते यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात सविता दाते आणि संशयित मनोज हांडे यांची काही काळापूर्वी फेसबुकवर (Facebook) ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद (Dispute) निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सविता दाते यांनी यापूर्वीही आळेफाटा पोलीस ठाण्यात (Alephata Police Station) तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या गुन्ह्यांपैकी एका प्रकरणात संशयितास अटक होऊन तो न्यायालयीन कोठडीत होता. काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पार्श्वभूमीवर वैमनस्यातून हा गुन्हा घडल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी मनोज महादेव हांडे (रा. चैतन्यपूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1) तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम घांते पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावरील ओळखी आणि त्यातून उद्भवणार्‍या वादांबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...