मुंबई | Mumbai
भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध टी २० मालिकेत ४-१ ने मालिका विजय संपादन केल्यानंतर आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे. भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिकेला आजपासून (दि.६ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ही मालिका महत्वाची असणार आहे.या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीवर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्याची संधी असणार आहे. विराट कोहलीने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेट सामन्यात १३४० धावा केल्या आहेत. या मालिकेत ३६० धावा केल्या तर इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. तसेच त्याने २९३ धावा केल्या तर त्याला वेस्ट इंडिज संघाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज क्रिस गेलचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. गेलने इंग्लंड विरुद्ध १६३२ धावा केल्या असून, तो पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीने या मालिकेत १९५ धावा केल्या तर भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) १५४६ धावा केल्या आहेत.
पंत की राहुल?
ऋषभ पंत आणि केएल राहुलपैकी कोणाला यष्टिरक्षणाची जबाबदारी द्यायची याचा पेच संघ व्यवस्थापनासमोर असेल. रोहित व उपकर्णधार शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. यानंतर कोहली व श्रेयस अय्यर येतील. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाजाला पाचव्या स्थानी उतरवण्याची शक्यता आहे. यानंतर हार्दिक पंड्याचा क्रमांक येतो. पंतच्या अनुपस्थितीत एकदिवसीय विश्वचषकात राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती आणि ४५२ धावा केल्या होत्या. त्याच्या उपस्थितीत संघ संयोजन चांगले तयार झाले होते. भारतीय फलंदाजी क्रमवारीत डावखुरा पंत हा वेगळेपण आणतो. यासह तो आक्रमक फलंदाजी करतो आणि त्यामुळेच तो संघासाठी निर्णायक ठरू शकतो. भारतीय संघ व्यवस्थापन या दोघांनाही एकत्र संधी देऊ शकतो. मात्र, त्यासाठी अय्यरला बाहेर बसावे लागू शकते.
शमी, कुलदीपवर नजर
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि चायनामन कुलदीप यादवला सरावाची संधी मिळणार आहे. हे दोन्ही गोलंदाज दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे मालिका खेळत नाही. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत चमक दाखवणाऱ्या वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याने चांगली कामगिरी केल्यास चॅम्पियन्स करंडकाच्या संघातील आपली दावेदारी तो भक्कम करू शकतो.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा
एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद