पुणे । Pune
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी (Independence Day 2025) लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. आपल्या भाषणात मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्याचा गौरव केला आहे. आरएसएस जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. संघाच्या 100 वर्षांच्या सेवाकार्याचा देशाला गर्व आहे असे उद्गार पीएम मोदी (PM Modi) यांनी काढले. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे.
देशाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी सेवाकार्याचे कौतुक केले. संघ ही जगातील सर्वात मोठी एनजीओ असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. मात्र, या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून, “स्वातंत्र्य चळवळीत आरएसएसचा सहभाग काय होता?” असा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पुण्यातील टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात बोलताना सपकाळ म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. काँग्रेसचे नेतृत्व, त्याग आणि कर्तृत्व यामुळेच हा लढा यशस्वी झाला. परंतु, जेव्हा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेव्हा काही लोक ब्रिटिशांच्या बाजूने होते, त्यांच्याकडून पेन्शन घेत होते आणि लढ्यात कोणताही सहभाग नव्हता. आज तीच शक्ती सत्तेवर आहे.”
सपकाळांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटले की, गेल्या ११ वर्षांत लाल किल्ल्यावरून केलेली अनेक विधानं वास्तवापासून दूर आहेत. “संघाबद्दल आज पंतप्रधानांनी जे सांगितलं, ते देखील असत्य आहे,” असा आरोप त्यांनी केला.
स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात त्यांनी भारताच्या फाळणीच्या वेदनांवर भाष्य केले. “पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वामुळे देश एकसंध राहिला, अन्यथा ६०० छोटे देश निर्माण झाले असते,” असे त्यांनी सांगितले. भाजप सरकारवर हल्ला चढवत त्यांनी विचारले, “१३ ऑगस्टला मंत्रालय रात्रभर उघडे ठेवून ‘फाळणी दिन’ साजरा करण्याचा आदेश काढणे हा कोणता प्रकार?” याचबरोबर, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाच्या काळात आरएसएस आणि विनायक दामोदर सावरकर कुठे होते, असा प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना विचारला. “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोण मोठी किंमत मोजून गेले, हे सर्वांना ठाऊक आहे,” असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी तरुणांना दरमहा १५ हजार रुपयांची मदत देण्याच्या घोषणेवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले, “याआधी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, अशा घोषणा केल्या होत्या. त्याचे पुढे काय झाले, हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे ही घोषणा देखील फसवी ठरण्याची शक्यता आहे.” स्वातंत्र्य दिनी मांसाहार विक्रीवरील बंदीवरून टीका करताना सपकाळ म्हणाले, “ही संकल्पना फक्त ‘वन नेशन, वन इलेक्शन’ पुरतीच मर्यादित राहणार नाही. भाजप ‘वन नेशन, वन लिडर, एकच पेहराव, एकच भाषा, एकच टिव्ही चॅनल, एकच व्यंजन’ अशी विचित्र योजना राबवू पाहत आहे. हा हास्यास्पद प्रकार आहे.”





