नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बोलताना मध्यपूर्वेतील संकटामुळे भारत चिंतित असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी तणाव कमी करण्यासाठी संवादाचा मार्ग निवडण्यावर भर दिला आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
“पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. भारत संवादाच्या माध्यमातून सर्व संघर्ष सोडवले जावेत याचे समर्थन करतो. या भागात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व देशांबरोबर मिळून काम करत राहू,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
Taliban Attack Pakistan: तालिबानचा पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक, नूर खान एअर बेससह तळांवर हल्ले
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी ही भूमिका मांडली. या भेटीदरम्यान भारत आणि कॅनडा यांच्यात युरेनियमविषयक ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. याशिवाय, अणुऊर्जा सहकार्य अधिक बळकट करत स्मॉल मॉड्युलर रिऍक्टर्स क्षेत्रात दोन्ही देश संयुक्तपणे काम करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
आम्ही सदैव शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. आणि जेव्हा दोन लोकशाही एकत्र येतात तेव्हा शांततेचा आवाज आणखी सशक्त होतो, असेही पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, दहशतवाद आणि कट्टरतावाद यांचा प्रभाव या विषयावर कॅनडा आणि भारत यांची एकच भूमिका आहे. ही संपूर्ण जगासमोर असलेली मोठी आव्हाने आहेत, असेही मोदींनी स्पष्ट केले.
मोठी बातमी! विमानसेवा बंदचा मोठा फटका; सौदीत उमरासाठी गेलेले ५० हजार यात्रेकरू अडकले
बेंजामिन नेतन्याहूंशी फोनवरुन संवाद
यापूर्वी सोमवारी मध्यरात्री पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर शत्रुत्व समाप्त करण्याची गरज असल्यावर भर दिला.
खाडी देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार सज्ज
दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, खाडी देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकार पूर्णतः सज्ज आहे. यासंदर्भात परदेशातील भारतीय दूतावास आणि मिशनशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. युक्रेनमधील संकटाच्या काळातही भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणले होते, याची आठवण करून देत त्यांनी स्पष्ट केले की, जिथे जिथे भारतीय आहेत, तिथे त्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.





