Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMonsoon 2026 : यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; 'स्कायमेट'ने वर्तवली धोक्याची घंटा

Monsoon 2026 : यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ‘स्कायमेट’ने वर्तवली धोक्याची घंटा

मुंबई । Mumbai

मान्सूनबाबत एक महत्त्वाची आणि काहीशी चिंतेची बातमी समोर आली आहे. २०२६ या वर्षात देशात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘स्कायमेट’ (Skymet) या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी आपला सुधारित अंदाज जाहीर केला असून, यंदा पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९४ टक्के राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे शेती आणि जलसाठ्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या हंगामावर यंदा ‘एल निनो’ (El Nino) या हवामान स्थितीचा मोठा प्रभाव दिसून येईल. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढल्याने ‘एल निनो’ सक्रिय होतो, ज्याचा थेट फटका भारतीय मान्सूनला बसतो. विशेषतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील उत्तरार्धात, म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ‘एल निनो’ची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे पावसाचा जोर ओसरू शकतो.

हंगामाच्या सुरुवातीला, म्हणजे जून महिन्यात मान्सूनची स्थिती तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, जुलै ते सप्टेंबर या मुख्य पावसाळी महिन्यांमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागांमध्ये पावसाची मोठी कमतरता जाणवू शकते. या भागांत प्रामुख्याने खरीप पिके घेतली जातात, त्यामुळे पावसाच्या या खंडामुळे किंवा कमतरतेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

भारताच्या एकूण वार्षिक पावसापैकी सुमारे ७० टक्के पाऊस हा दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे मिळतो. देशातील १४० कोटींहून अधिक लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक आजही उदरनिर्वाहासाठी थेट शेतीवर अवलंबून आहेत. खरीप हंगामातील पेरण्या प्रामुख्याने जून आणि जुलै महिन्यात होतात. मान्सूनचे वेळेवर आगमन आणि त्याचे समतोल वितरण हे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनासाठी (GDP) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशातच पावसाची घट अन्नधान्य उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला धक्का देऊ शकते.

स्कायमेटने आपला अंदाज वर्तवला असला तरी, आता सर्वांचे लक्ष भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकृत अंदाजाकडे लागले आहे. आयएमडी पुढील आठवड्यात मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे. सामान्यतः मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि १५ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो.

एल निनो व ला निनामध्ये फरक काय?

  • एल निनो: पॅसिफिक महासागराचे पाणी गरम होणे. यामुळे मान्सूनवर नकारात्मक परिणाम होऊन पाऊस कमी होतो.
  • ला निना: पॅसिफिक महासागराचे पाणी थंड होणे. ही स्थिती मान्सूनसाठी पोषक असते आणि यामुळे पाऊस चांगला होतो.

सध्याच्या स्थितीनुसार, ‘ला निना’चा प्रभाव कमी होऊन ‘एल निनो’ प्रबळ होत असल्याने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज गडद होत आहे. आगामी काळात हवामान विभागाकडून येणाऱ्या अपडेट्सवर शेतीचे नियोजन अवलंबून राहणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने...

0
नाशिक | Nashik खरीप हंगाम-२०२६ मध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १० तालुक्यांत प्रथम कळ (Trigger-1) लागू करण्यात आला आहे....