नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनात भारत आणि पाकिस्तानमधील राजनैतिक संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणात काश्मीर, सिंधू जलकरार आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य केल्यानंतर भारताने Right of Reply अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या संयुक्त राष्ट्रातील प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाचा आरोप करत, “दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील” असा स्पष्ट इशारा दिला.
पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे प्रत्युत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. तसेच भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. भारताने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळून लावत काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
पाकिस्तानवर कोणाचे नियंत्रण आहे जगाने भ्रमात राहु नये
पाकिस्तानच्या भाषणाला उत्तर देताना पेटल गहलोत यांनी पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाच्या कथित धोरणावर थेट निशाणा साधला. पेटल गहलोत म्हणाल्या, “पाकिस्तानवर प्रत्यक्षात कोणाचे नियंत्रण आहे, याबाबत जगाने कोणत्याही भ्रमात राहू नये. स्वतःच्याच जनतेपासून राजधानीचे संरक्षण करण्यासाठी ज्या देशाला तटबंदी उभारावी लागत आहे, ती राजवट आज लोकशाही अधिकार आणि मानवी मूल्यांवर ढोंगी उपदेश देत आहे. कारण ही व्यवस्थाच मुळात सैन्याची, सैन्याकडून आणि सैन्यासाठी चालवली जात आहे. त्यांचे बाहुले (पंतप्रधान) येतील आणि जातील; मात्र खरी सूत्रे कोणाच्या हातात आहेत, हे जगाला ठाऊक आहे.”
दिवसभर शांततेच्या गप्पा झोडणारे रात्री दहशतवादी कृत्ये करतात
पेटल गेहलोत यांनी ओसामा बिन लादेनचा उल्लेख करत पाकिस्तानला चागंलेच सुनावले. “९/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला २५ वर्ष झाले. या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानी लष्करी अकादमीच्या अगदी शेजारीच राहत होता,” अशी आठवण गहलोत यांनी करून दिली. तसेच दिवसभर शांततेच्या गप्पा झोडणारे रात्रीच्या वेळी मात्र, दहशतवादी कृत्ये करतात.
राष्ट्रीय विक्रम मोडला, ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला; सावन बरवालचा ऐतिहासिक रौप्यपदकावर कब्जा
तर त्यांनी PoK वर बोलावे
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. जर पाकिस्तानला काश्मीरसंदर्भातच बोलायचे असेल, तर त्यांनी PoK वर बोलावे. तेथील हिंसाचार, हत्या आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनासंदर्भात चर्चा करावी. एवढेच नाही तर तेथील अल्पसंख्याकांवरील अत्याचारासंदर्भातही गेहलोत यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, ज्या देशाचा मुख्य आधारच ईशनिंदा कायदा आहे आणि जेथे धार्मिक अल्पसंख्याकांवर सातत्याने अत्याचार होतात, त्यांनी धार्मिक असहिष्णुतेच्या बाता मारू नये, अशा शब्दांत गेहलोतत यांनी पाकिस्तानला फटकारले.
पाकिस्तानला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील
पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादावर बोट ठेवत गहलोत यांनी स्पष्ट केले की, “आपल्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षणाचा अधिकार वापरण्यास भारत कटिबद्ध आहे. दहशतवाद्यांना लपायला आता जगात कुठेही जागा उरलेली नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही; याचे पाकिस्तानला अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील. दरवर्षी आमसभेत येऊन असत्य बडबडल्याने ते सत्य ठरत नाही.”




