
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराणमध्ये सरकारविरोधातील आंदोलनानंतर सुरु झालेल्या हिंसाचाराने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. सरकारविरोधी आंदोलनादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खमेनेई यांनी अनेक आंदोलकांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकाही इराणविरोधात कधीही लष्करी कारवाई सुरू करेल, असे दावे केले जात आहेत. इराणमधील वेगाने बिघडत चाललेली सुरक्षा व्यवस्था आणि राजकीय अस्थिरता पाहता तेहरानमधील भारतीय दूतावासने तेथील भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय दूतावासाने तेहरानमधून प्रसिद्ध केलेल्या या सूचनेमध्ये म्हटले आहे की, इराणमधील बदलती स्थिती पाहता सद्यस्थितीत इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना प्राप्त असलेल्या वाहतुकीच्या कोणत्याही साधनाच्या माध्यमातून इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटकांना उपलब्ध व्यावसायिक विमानांच्या माध्यमातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणमध्ये सध्या सुरू असलेली राजकीय अस्थिरता आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ही खबरदारी घेतली आहे. दूतावासाने स्पष्ट केले आहे की, हा सल्ला ५ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचाच पुढील भाग आहे. “इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी कोणत्याही उपलब्ध वाहतूक साधनांचा वापर करून इराण सोडावे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सर्व भारतीय नागरिकांनी सद्यस्थितीत इराणमध्ये राहताना सावधगिरी बाळगावी, विरोधी आंदोलन किंवा संवेदनशील ठिकाणी जाणे टाळावे. तसेच इराणमध्ये भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि ताज्या घड्यामोडींबाबत जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.




