नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशात एकाच वेळी हवामानाची दोन परस्परविरोधी रूपं पाहायला मिळत आहेत. केरळमध्ये मान्सून लांबल्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनचं आगमन उशिरा होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. याबाबत शुक्रवारी हवामान विभागाने ताजे अंदाज वर्तवले आहे. भारत हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासाठी यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पडण्याचा आणि पावसाळ्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरात यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर 2026) दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानले जाते. महाराष्ट्र हा प्रामुख्याने मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्प या दोन्ही विभागांत मोडतो. या दोन्ही विभागांत यंदा सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य भारतात ४३ टक्के तर दक्षिण द्वीपकल्पात ४५ टक्के संभाव्यता कमी पावसाची आहे.
भारतीय हवामान विभागाकडून १३ एप्रिल रोजी मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला होता. त्यात ”एल निनो” स्थिती जून महिन्यात विकसित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. हीच शक्यता कायम ठेवण्यात आली असून पुढील काही महिन्यात ”एल निनो” स्थिती विकसित होईल सप्टेंबर महिन्यात ती अधिक तीव्र होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संशयितांच्या अडचणीत वाढ, नाशिक शहर पोलिसांचं विक्रमी ६५ दिवसांत नऊ गुन्ह्यांचं चार्जशीट दाखल
महाराष्ट्रात कसा असणार मान्सून
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, ३१ मे ते ३ जूनदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजा कडाडणार आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात मान्सूनचे वारे दक्षिण भारताच्या काही भागात व्यापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ४ ते ११ जूनपर्यंत कोकण, गोवा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाची तूट अन् उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाची तूट असतानाच, हवामान विभागाने ने जूनमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांत सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि काही अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. यंदा राज्यात ही पर्जन्यमान कमीच असेल यामुळे शेकऱ्यांसह नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ शकतो अशीही शक्यता आहे.
एल निनोचा प्रभाव राहणार
सध्या प्रशांत महासागरावर न्यूट्रल परिस्थिती असली तरी, मान्सून हंगामाच्या उत्तरार्धात ‘एल निनो’ परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ज्या ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो, त्या वर्षात भारतात, विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तूट अधिक जाणवते.




