नाशिक | Nashik
शहरातील टीसीएस कंपनीत (TCS Company) सहकाऱ्याचा धार्मिक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने (Court) जामीन तर मंजूर केला, मात्र त्याच वेळी त्यांना थेट नाशिक शहरात राहण्यास आणि प्रवेश करण्यास बंदी (नो एन्ट्री) घातली आहे. जामीन मिळाला म्हणजे सुटका झाली या भ्रमात राहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित खारकर यांच्या आदेशामुळे झटका बसला असून, या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
संशयित रझा रफिक मेमन, तौसिफ बिलाल अत्तार आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी अशी नाशिक शहर बंदी झालेल्या संशयितांची नावे आहेत. साधारणतः जामीन मिळताच संशयित मोकळे फिरतात, ज्यामुळे पीडित व्यक्ती आणि साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता असते. मात्र, न्यायालयाने कायदा सुव्यवस्था आणि साक्षीदारांच्या (Witnesses) सुरक्षेचा कडेकोट विचार करून संशयितांचे पंख छाटून टाकले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : हिरावाडीत गाेळीबाराचा थरार; थेट संशयिताच्या आईवर फायरिंग, चाैघे अटकेत
प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police Station) वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करून गुन्ह्याचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडले. सरकारी वकिलांनीही संशयितांच्या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला होता. तपास पूर्ण झाल्याने न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला असला, तरी शहरात प्रवेश बंदी करून संशयितांवर अघोषित तडीपारीचीच कारवाई केली आहे. या भूमिकेमुळे पीडित कुटुंबाला आणि साक्षीदारांना दिलासा मिळाला आहे.
…या आहेत अटी
- संशयितांना नाशिक शहराची सीमा सोडावी लागणार
- नाशकात राहता येणार नाही
- दर सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हजेरी
- मुंबई नाका पोलीस ठाण्यात यावे लागणार
- कोर्टाच्या तारखेला आणि पोलीस ठाण्यातील हजेरी संपताच त्यांना पुन्हा शहराबाहेर जावे लागणार




