मुंबई | Mumbai
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका नव्या एपिसोडवरुन वाद पेटला आहे. या शोमध्ये पाहुणा म्हणून आलेला युट्युबर रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पण, समय रैनाच्या या कार्यक्रमात अलाहाबादियाने केलेल्या अश्लील टिपण्णीमुळे आता फक्त सोशल मीडियातूनच नव्हे तर राजकीय नेत्यांनीदेखील त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणी थेट गृहमंत्र्यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
“मला याची माहिती मिळाली आहे. मी अजून प्रत्यक्षात तो व्हिडीओ पाहिलेला नाही. फार घाणेरड्या पद्धतीने काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत, सादर केल्या गेल्याचे मला कळले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे,” असे म्हटले. तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी त्याने इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेव्हा संपते जेव्हा आपल्या या स्वातंत्र्यामुळे इतराच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करते. अशाप्रकारचे अतिक्रमण करणे योग्य नाही. अभिव्यक्तीचीही काही मर्यादा आहे. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचेही काही नियम तयार केले आहेत. या नियमांचे कोणी उल्लंघन करत असेल तर ही फार चुकीची गोष्ट आहे. असे काही घडले असेल तर त्याच्याविरोधात कारवाई व्हायला हवी,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तक्रार दाखल, महिला आयोगाकडे तक्रार
या प्रकरणी, युट्यूबर रणवीर अलाहाबादिया, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पत्रात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
युट्युबर आशिष चंचलानी, कंटेंट क्रिएटर अपूर्व मुखिजा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादिया हे समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमात आले होते. यावेळी रणवीर अल्लाहबादियाने आई-वडिलांबाबत अत्यंत खालच्या स्तरावर जात, अश्लील टिप्पणी केली. त्याच्या या वक्तव्याने लोकांचा संताप अनावर झाला आहे. त्याने केलेल्या या विधानानंतर आता देशभरातून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तसेच, यापूर्वीही या शोविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेटकऱ्यांकडून रणवीरवर टिकेची झोड उठवली जात असून याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
रणवीर अलाहाबादियाकडून माफिनामा
31 वर्षीय रणवीर अलाहबादियाने एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने कॅप्शन दिली आहे की, “इंडियाज गॉट लॅटंटमध्ये मी जे काही म्हणलं तो बोलायला नको होतं. मी माफी मागतो”. व्हिडीओमध्ये रणवीर अलाहबादिया सांगत आहे की, “माझी टिप्पणी अजिबात योग्य नव्हती. ती मजेशीरही नव्हती. विनोद हा माझा पिंड नाही, मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे”. “अर्थातच मी या प्लॅटफॉर्मचा वापर अशा प्रकारे करू इच्छित नाही. जे काही घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ, औचित्य किंवा तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. वैयक्तिकरित्या माझा निर्णय घेण्यात चूक झाली. माझ्याकडून ते कूल नव्हते”. “हा पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मी अशी व्यक्ती बनू इच्छित नाही जी ती जबाबदारी गांभीर्याने घेणार नाही. मी कधीही कुटुंबाचा अनादर करणार नाही,” अशीही बाजू त्याने मांडली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा