अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इन्फिनाईट बिकन कंपनीच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अगस्ती मिश्रा, राहुल काळोखेचा प्रमुख साथीदार संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विनायक ज्ञानेश्वर मराठे (रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने नऊ दिवसांची (27 ऑक्टोबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला काल (शनिवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
सिस्पे, ट्रेडस, इन्फिनाईट बिकन अशा विविध कंपन्यातून हजारो गुंतवणुकदारांची शेकडो कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा, सुपा, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. यामध्ये एजंट, संचालकांचा समावेश आहे. विनायक मराठे हा देखील संचालक असून त्याला तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पांडुरंग खामकर या संचालकाला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत दोन संचालक अटक केले आहे.
विनायक मराठे हा या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संचालक अगस्ती मिश्रा व राहुल काळोखेचा साथीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दरम्यान इतर संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ज्या लोकांनी कंपनीत पैसे गुंतवणूक केली आहे व त्यांना परतावा व त्यांची गुंतवणुकीची रक्कम परत मिळालेली नाही असा गुंतवणुकदारांनी आपल्याकडील गुंतवणुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत जबाबासाठी हजर रहावे, असे आवाहन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. गोर्डे यांनी केले आहे.





