सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
नाशिकमध्ये आयटी पार्क असला तरी हा उद्योग अजून म्हणावा असा बहारलेला नाही. नाशिकला आयटी पार्कसाठी इन्फोसिसने पुढाकार घ्यावा यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी इन्फोसिसच्या संस्थापक सुधा मूर्ती यांची भेट घेत त्यांना साकडे घातले.
नाशिकमध्ये आयटी पार्क व्हावा अशी जुनी मागणी असून खासदार वाजे देखील याबाबत सातत्याने आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी केंद्रीय पातळीवर पाठपुरावा देखील सुरू केला आहे. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आदींसोबत देखील खासदार वाजे यांनी याआधी चर्चा केली आहे. आयटी उद्योगाला चालना देण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, काय अडचणी आहेत, काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत खासदार वाजे यांनी इन्फोसिसच्या संस्थापक तथा खासदार सुधा मूर्ती यांच्यासोबत चर्चा केली.
नाशिकमध्ये आयटी पार्क व्हावा याबाबत अनेकदा घोषणा झाल्या. अगदी उद्घाटनदेखील पार पडले. मात्र, या सगळ्या घोषणा फक्त निवडणुकीतील जुमला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, खासदार वाजे यांनी आयटी उद्योग नाशकात बहरावा यासाठी शाश्वत आणि ठोस पाऊल टाकायला सुरवात केली आहे. त्या दृष्टीने खा. वाजे यांनी नाशिक महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आदींसोबत चर्चा करून काय संधी आहेत, कसे काम पुढे नेता येईल, आयटी उद्योग नाशिकला कसा उभारला जाऊ शकतो याबाबत चर्चा केली. तसेच केंद्रीय पातळीवर देखील पाठपुरावा केला जातोय. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे देखील याबाबत खा. वाजे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.