नागपुर | Nagpur
पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर (Narsapur Crime) येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिच्या हत्येने (Four Year Girl Rape and Murder) महाराष्ट्र हादरले आहे. देशभरात या घटनेचे पडसाद उमटले आहे. आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी पुणे-बंगळुरू महामार्ग आंदोलकांनी (Movement) जाम केला होता. याप्रकरणी आंदोलकांची समजूत काढण्यात आली. तर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसल्याचा नाव न घेता आरोप केला आहे.
काहीजण या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. नरसापूर येथील मुलीच्या हत्येनंतर भोर (Bhor) तालुक्यासह पुण्यात संतप्त पडसाद उमटले होते. शनिवारी संध्याकाळी नसरापूरमधील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह (Dead Body) घेऊन पुण्यातील नवले पूल (Navale Bridge) गाठला होता. याठिकाणी तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. रात्री उशीरा मुलीचे आई-वडील हे पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घ्यायला राजी झाले. मात्र, त्यावेळी काहीजण त्यांना आंदोलन मागे घेऊ देत नव्हते. ते त्यांना अडवत होते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नसरापूर प्रकरणावरुन विरोधकांना फटकारले. मी काल स्वत: पिडीतेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तसे पत्र आम्ही पिडीतेच्या कुटुंबाला दिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ही घटना गंभीर आहे, रोष साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही चुकीचे नाही. काही लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो, त्यांनी परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते. ते लोक कोण आहेत, हे लक्षात आले आहे. मात्र, मुलीच्या वडिलांनी जी काही भूमिका घेतली, त्यासाठी मी आभारी आहे. आम्ही आरोपीवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही माहिती घेत आहोत. मात्र, या गुन्ह्यातून तो बाहेर येऊच शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.





