श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
राज्यात गाजत असेलला सिस्पे, इन्फीनिटी बीकॉन आदी एलएलपी कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांना गंडा घालणार्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार नवनाथ औताडे याच्या पत्नी सुवर्णा औताडे आणि मुलगा शुभम औताडे याला अतिरिक्त सत्र न्यायालयात तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे. शुभम आणि सुवर्णा या दोघांनी आर्थिक गुन्हे शाखेत दि. 29 आणि 30 जुलै रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत हजेरी लावायची आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिनांक 7 जुलैला सिस्पे, इन्फिनिटी, बिकॉन आदी कंपन्यांचा संचालक नवनाथ औताडे आणि इतरांवरोधात श्रीगोंदा आणि नगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नवनाथ जगन्नाथ औताडे, अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, ययाती मिश्रा, शुभम नवनाथ औताडे, सुवर्णा नवनाथ औताडे, रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे, अनिल दरेकर, संदीप दरेकर अशी आरोपींची नावे असून यापैकी एजंट अनिल दरेकर व रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या न्यायालीन कोठडीत आहेत.
दरम्यान, मुख्यप्रवर्तक आणि या घोटाळ्याचा मास्टर माईंड असलेल्या नवनाथ औताडे याच्या पत्नी सुवर्णा औताडे आणि मुलगा शुभम औताडे यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेल्या अर्जात या दोघांना तात्पुरता जामीन देण्यात आला आहे. न्यायालायीन कोठडीत असलेल्या एजंट अनिल दरेकर आणि रंगनाथ गलांडे यांच्या जामिनावर पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
गुंतवणूकदार आणि आरोपींचा सल्लागार एकच!
सर्वात आधी फसवणूक झालेले गुंतवणूक यांना जे सल्लागार होते त्यांनीच आरोपीची बाजू मांडण्याचे काम हाती घेतले असल्याने आता खरी अडचण गुंतवणूकदाराची झालेली आहे. पन्नास ते साठ एजंटवर गुन्हे होण्यापूर्वीच त्यांचे जामीनासाठी प्रतिज्ञापत्र करून घेण्यात आले आहेत. आता दोन्हीकडचे सल्लागार एकच असल्याने गुंतवणूकदार ही डोक्याला हात लाऊन बसले आहेत.
मनी हिस्ट वेबसिरीससारखा घटनाक्रम
नेटफ्लिक्सवरील मनी हिस्ट नावाच्या वेबसिरीजमध्ये प्रोफेसर नावाचे पात्र पडद्याआड राहून यंत्रणा चालवते. या घोटाळ्यात देखील तसाच काहिसा घटनाक्रम असून वेबसिरीजमधील टोकियो, ओर्लो, मॉस्को, बर्लिन, रिवो, डीनबृह, कोलीसिंगी या पात्रांसारखी भूमिका गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या कपंन्यांचे एमएफ आणि संचालक पार पाडत आहेत.




