गुवाहाटी । Guwahati
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामातील तिसरा रोमांचक सामना आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात रंगणार आहे. आसाम क्रिकेट संघटनेच्या गुवाहाटी येथील स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता या लढतीला सुरुवात होईल.
या दोन्ही संघांमधील आजवरचा इतिहास पाहता सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण ३१ सामने झाले असून, त्यापैकी चेन्नईने १६ तर राजस्थानने १५ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आधारस्तंभ आणि दिग्गज खेळाडू एम. एस. धोनी दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची रणनीती कशी असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेष म्हणजे, गेल्या हंगामात राजस्थानकडून खेळलेला संजू सॅमसन यंदा चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला असून, तो यष्टिरक्षणाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गेल्या हंगामात चेन्नईचे प्रतिनिधित्व केलेला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यंदा राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे.
गुवाहाटीच्या खेळपट्टीचा अंदाज घेतल्यास, येथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही खेळपट्टीकडून समान साथ मिळण्याची शक्यता आहे. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत असला तरी तो चांगल्या प्रकारे ‘मूव्ह’ देखील होतो, ज्यामुळे फलंदाजांची कसोटी लागेल. सांख्यिकीनुसार, या मैदानावरील २० पैकी ११ सामन्यांत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला पसंती देऊ शकतो. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला किमान २०० धावांचे लक्ष्य गाठणे आवश्यक ठरेल. हवामान खात्यानुसार, दुपारपर्यंत पावसाच्या काही सरी कोसळू शकतात, मात्र सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी असून ढगाळ वातावरण राहील. ८५ टक्के आर्द्रता खेळाडूंचा कस पाहणारी ठरेल.
या हंगामात राजस्थान रॉयल्सने रियान परागकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली असून, त्याला आपल्या घरच्या मैदानावर नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे. राजस्थानने सॅम करनच्या जागी दासुन शनाकाची निवड केली असून त्याची कामगिरी किती निर्णायक ठरते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. चेन्नईसाठी संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड ही नवीन सलामीची जोडी मैदानात दिसेल. तसेच, १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेच्या कामगिरीचीही सर्वांना उत्सुकता आहे.
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल आणि आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायर यांना रोखण्याचे मोठे आव्हान चेन्नईच्या गोलंदाजांसमोर असेल. एम. एस. धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याची चर्चा असताना, हंगामाच्या पहिल्याच सामन्यात तो मैदानात नसणे ही चाहत्यांसाठी काहीशी निराशाजनक बाब ठरेल. मात्र, दोन्ही संघांमधील बदललेले खेळाडू आणि नवीन नेतृत्व यामुळे हा सामना आयपीएल २०२६ मधील एक संस्मरणीय लढत ठरण्याची शक्यता आहे.





