Wednesday, April 22, 2026
Homeदेश विदेशHormuz Strait: जागतिक तेलसंकट गडद होणार?होर्मुझची सामुद्रधुनी इराण बंद करणार; इराणच्या संसदेत...

Hormuz Strait: जागतिक तेलसंकट गडद होणार?होर्मुझची सामुद्रधुनी इराण बंद करणार; इराणच्या संसदेत प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायल-इराण याच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. इराण आणि इस्रायल युद्धात आता अमेरिकेने देखील उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्‍या तीन अणुतळांवर हल्‍ला केल्‍यानंतर आता इराणने संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढणारा निर्णय घेतला आहे. हल्‍ल्‍याला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी ट्रेट ऑफ होर्मुझ म्‍हणजेच होर्मुझ सामुद्रधुनी (पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडणारा अरुंद सागरी मार्ग) बंद करण्‍याच्‍या प्रस्‍ताव इराणच्‍या संसदेत मंजूर झाला आहे. इराणच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगावर इंधन तुटवड्याचे व दरवाढीचे संकट घोंघावू लागले आहे.

याबाबत इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने माहिती दिली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगभरातील तेल व्यापारासाठी खूप महत्त्वाचा मार्ग आहे, ह्या मार्गातून जवळपास ३० टक्के जागतिक पेट्रोलियम शिपमेंटची वाहतूक होते. हे बंद करण्याचा निर्णय संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. सध्या संसदेत या प्रस्तावावर एकमत झाले आहे, मात्र अंतिम निर्णय इराणची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेईल. ही परिषदच देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय घेते.

- Advertisement -

काय आहे होर्मुझ सामुद्रधुनी?
दोन मोठ्या जलसाठ्यांना जोडणारा एक अरुंद जलमार्ग म्‍हणजे होर्मुझ सामुद्रधुनी. पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडणारा अरुंद सागरी मार्ग असणार्‍या होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्‍वाच्‍या चोकपॉईंटपैकी एक आहे. पर्शियन आखात आणि ओमानचे आखात या दोन मोठ्या जलसाठ्यांना होर्मुझची सामुद्रधुनी जोडते, जो पुढे अरबी समुद्राला मिळतो. त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर सुमारे ३३ किमी रुंद असलेला हा अरुंद कालवा इराणला (उत्तरेला) अरबी द्वीपकल्पापासून (दक्षिणला) वेगळे करतो. या मार्गाने जागतिक तेलाच्या सुमारे ३० टक्के आणि जगातील एक तृतीयांश एलएनजी या सामुद्रधुनीतून दररोज वाहतूक केली जाते. तिच्या भौगोलिक स्थानामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीला कोणताही सागरी पर्याय नाही. इराण स्वतःच्या व्यापारासाठीही या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे आणि त्यात अडथळा आणल्यास त्याचे आणि त्याच्या मित्र देशांचेही नुकसान होईल. या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली, तर त्याचे परिणाम जगभरातील तेल आणि एलएनजी व्यापारावर होतील आणि कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील. तेलाच्या किमतीतील कोणत्याही चढ-उताराचा परिणाम इतर अनेक वस्तू आणि मालाच्या किमतींवर होतो. त्‍यामुळेच होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूकच बंद झाल्‍याचा याचा थेट फटका आशियातील राष्‍ट्रांना बसणार आहे.

सौदी अरेबिया, इराक, युएई, कतार, इराण आणि कुवेत या प्रादेशिक महासत्तांमधून होणाऱ्या तेल निर्यातीचा मोठा भाग या अरुंद जलमार्गातून जातो. एक काळ असा होता जेव्हा पाश्चिमात्य देशांना, प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपला, पर्शियन आखातातील ऊर्जा प्रवाहातील अडथळ्यांचा सर्वाधिक फटका बसत असे, परंतु आज कोणत्याही अडथळ्याचा फटका चीन आणि आशियाला सहन करावा लागेल.

भारतावर होणार परिणाम?
अमेरिकेने शनिवारी इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर लगेचच इराणने ते होर्मुझ सामुद्रधुनी बंद करू शकतात असे संकेत दिले होते. तज्ज्ञांच्या मते जर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद करण्यात आले आणि जहाजांची ये-जा बंद झाली तर संपूर्ण जगाबरोबरच भारतावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. इराणच्या या निर्णयानंतर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि महागाई वाढू शकते. यामुळे भारताच्या आर्थिक गतीवर देखील परिणाम होऊ शकतो.

भारताने कच्चे तेल पुरवठ्यात विविधता आणली
आंतरराष्‍ट्रीय पातळीवर सुरु असणार्‍या घडामोडींचा तेल पुरवठ्यावर कोणता परिणाम होणार, याबाबत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही पश्चिम आशियातील विकसित होणाऱ्या भू-राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारताने गेल्या काही वर्षांत कच्चे तेल पुरवठ्यात विविधता आणली आहे. पूर्वीप्रमाणे आता आमच्या पुरवठ्याचा मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नाही. तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवड्यांचा पुरवठा असतो. त्यांना अनेक मार्गांनी पुरवठा होत राहतो. आमच्या नागरिकांना इंधन पुरवठ्याची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा संप सुरूच

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय...