Sunday, July 26, 2026
Homeनगरइराण-इस्रायल युद्धाची ठिणगी भारतीय शेतात

इराण-इस्रायल युद्धाची ठिणगी भारतीय शेतात

सिंचन साहित्याचे दर 40 टक्क्यांनी कडाडले

एकरूखे |वार्ताहर| Ekrukhe

पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात धगधगत असलेल्या संघर्षाचा निखारा आता थेट भारतीय शेतकर्‍यांच्या पदरात पडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राला मोठा फटका बसला असून परिणामी शेतीसाठी लागणारे पीव्हीसी पाईप, ठिबक आणि तुषार सिंचन संच कमालीचे महागले आहेत. ऐन उन्हाळी हंगामाच्या तोंडावर सिंचन साहित्याचे दर 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्याने बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

- Advertisement -

कच्चे तेल शुद्धीकरण प्रक्रियेतून मिळणार्‍या पेट्रोकेमिकल घटकांपासून सिंचनाचे साहित्य तयार केले जाते. मात्र युद्धामुळे कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका पीव्हीसी पाईपला बसला असून 55 एमएम पाईपचा 450 रुपयांचा दर आता 650 रुपयांवर, तर 90 एमएम पाईपचा दर थेट 850 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे पाइपलाईन टाकण्याचे स्वप्न पाहणार्‍या शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. केवळ पाईपच नव्हे, तर आधुनिक सिंचन पद्धतीही आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. पूर्वी 32 हजार 500 रुपयांना मिळणारा तुषार सिंचन संच आता 46 हजार रुपयांना मिळत आहे, तर एकरी ठिबक सिंचनाचा खर्च 40 हजारांवरून थेट 60 हजारांवर गेला आहे.

मोटारपंपांसाठी लागणार्‍या केबलच्या किमतीतही प्रति मीटर 6 रुपयांची वाढ झाली असून, 5 ते 7.5 एचपीच्या मोटारपंपांच्या किमतीत 7 ते 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे. उन्हाळी पिकांचे नियोजन करणार्‍या शेतकर्‍यांना आता सिंचनासाठी किमान 15 ते 20 हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. जागतिक युद्धाच्या सावटाखाली स्थानिक बाजारपेठेत झालेली ही दरवाढ शेतीचा उत्पादन खर्च वाढवणारी ठरणार असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...