दिल्ली । Delhi
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने आता भीषण वळण घेतले असून, जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या अमेरिकन संरक्षण यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. ज्या अमेरिकन डिफेन्स सिस्टमचा जगभरात गाजावाजा होता, ती इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसमोर पूर्णपणे हतबल ठरली आहे. युद्धाच्या पहिल्या चार दिवसांतच अमेरिकेला तब्बल २ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १६,००० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक आणि लष्करी फटका बसला असून, यात अत्याधुनिक रडार आणि लढाऊ विमानांचा समावेश आहे.
इराणच्या या सुनियोजित हल्ल्याचा सर्वात मोठा फटका कतारमधील ‘अल उदीद’ एअर बेसला बसला आहे. इराणी ड्रोन्सनी अमेरिकेच्या अत्यंत महागड्या ‘AN/FPS-132 अर्ली वॉर्निंग रडार’ यंत्रणेला लक्ष्य केले. सुमारे १.१ अब्ज डॉलर्स किमतीची ही यंत्रणा इराणने उद्ध्वस्त केली असून कतारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय, इराणने बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या (Fifth Fleet) मुख्यालयावरही जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल्स आणि महत्त्वाच्या लष्करी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी ‘थाड’ (THAAD) अँटी-बॅलिस्टिक मिसाइल यंत्रणा देखील इराणच्या हल्ल्यासमोर अपयशी ठरली आहे. जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी एअर बेस आणि यूएईमधील अल-रुवाइस येथील थाड रडार यंत्रणांना इराणच्या अचूक क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. ३०० दशलक्ष डॉलर्सचे हे रडार निकामी झाल्याने आता अमेरिकेच्या जागतिक डिफेन्स स्ट्रॅटेजीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकेची तीन अत्यंत प्रगत ‘F-15E स्ट्राइक ईगल’ लढाऊ विमानेही या संघर्षात निकामी झाली आहेत.
माजी एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी लिहिलेल्या लेखात या अपयशाचे तांत्रिक विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, ‘थाड’ यंत्रणा प्रामुख्याने उंचावरून येणाऱ्या बॅलिस्टिक मिसाइल्सना रोखण्यासाठी बनवली गेली आहे. मात्र, इराणने अत्यंत चाणाक्षपणे ‘लो-अँगल’ क्रूझ मिसाइल्स आणि आत्मघाती ड्रोन्सचा वापर केला. थाडसोबत असलेल्या पॅट्रियट आणि आयर्न डोम सारख्या सुरक्षा यंत्रणा एकाच वेळी विविध दिशांनी होणाऱ्या या ‘मल्टी-लेयर’ हल्ल्यांना रोखण्यात अपयशी ठरल्या.
या संदर्भात एअर मार्शल चोप्रा यांनी भारतीय हवाई दलाच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. २०२५ च्या एका संघर्षात पाकिस्तानने चिनी उपग्रहांच्या मदतीने भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टमचे नेमके लोकेशन शोधले होते. तरीही पाकिस्तानचे एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र S-400 च्या जवळ पोहोचू शकले नाही. भारतीय क्रू मेंबर्सनी अत्यंत वेगाने ही सिस्टम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली (Mobility), ज्यामुळे शत्रू गोंधळला आणि भारताचे संरक्षण अभेद्य राहिले. याउलट, अमेरिकेची यंत्रणा एकाच जागी स्थिर राहिल्याने इराणला ती उद्ध्वस्त करणे सोपे गेले. या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांच्या बाजारात अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का बसला असून, इराणने आपल्या ‘स्मार्ट’ युद्धतंत्राचा प्रभाव जगाला दाखवून दिला आहे.





