नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर लादलेल्या युद्धानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनीवर निर्बंध आणले आहे. अशाही परिस्थितीत भारताच्या विनंतीनंतर भारताच्या अनेक तेलवाहू जहाज भारताच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहे. या उलट इराण अनेक जहाजांकडून टोल वसूली करत आहे, तर काही देशांच्या जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी पार देखील करु देत नाहीये. मात्र यात जहाजांना प्रवासाची मुभा देण्याकरता भारताला कर भरावा लागला होता, अशा बातम्या सातत्याने समोर येत होत्या. या बातम्यांचे इराणने आता खंडन केले आहे.
इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारलेला नाही आणि पुढेही भारताला पूर्ण सहकार्य केले जाईल. इराणने या बातम्यांवर स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की आम्ही भारतावर कोणत्याही प्रकारचा टोल लादलेला नाही, हवेतर तुमच्या सरकारला विचारा, असे भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताअली यांनी म्हटलेय. काल, त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
जहाजांना अडथळ्यांशिवाय मार्ग उपलब्ध करुन दिले जाईल
इराणने भारतीय जहाजांना होर्मुझमधून सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. इराण भारत सरकारच्या सतत संपर्कात असून, जहाजांना अडथळ्याशिवाय मार्ग उपलब्ध करून दिले जाईल, असे स्पष्ट केले.
आम्हाला भारत सरकारला मदत करायची आहे
आमचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत. आम्हाला भारत सरकारला मदत करायची आहे आणि त्यांनीही या दिवसांत आमच्याशी असलेल्या संबंधांमुळे आम्हाला मदत केली आहे. आमचा ‘नौकानयन स्वातंत्र्यावर’ (freedom of navigation) विश्वास असून आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांशी बांधील आहोत. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी हे इराण आणि ओमानचे प्रादेशिक जलक्षेत्र आहे.”
ते तुम्ही भारत सरकारलाच विचारु शकता
“भारताने पैसे दिले आहेत की नाही, हे तुम्ही भारत सरकारला विचारू शकता.” ते पुढे म्हणाले, “इराण आणि भारत या दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत आणि भविष्यातही आमचे संबंध चांगले राहतील, असा आमच्या उच्चपदस्थांचा विश्वास आहे. सध्याच्या कठीण काळातही आमचे संबंध उत्तम आहेत.”
भारताने आधीच स्पष्ट केले
भारताने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, इराणला कोणताही टोल देण्यात आलेला नाही. युद्ध सुरू झाल्यानंतरही ९ LPG जहाजे सुरक्षित बाहेर पडली. सध्या सुमारे १५ भारतीय जहाजे फारसच्या आखातात अडकलेली आहेत, मात्र लवकरच ती सर्व जहाजे सुरक्षित बाहेर काढली जातील. एकूणच, इराणकडून दिलेल्या आश्वासनामुळे भारताला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी अमेरिका-इराण तणाव कायम असल्याने परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पुढील घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.




