अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इसळक (ता. नगर) शिवारातील खारेकर्जुने रस्त्यावरील खपके वस्तीवर सात जणांच्या टोळक्याने शनिवारी पहाटे चांगलाच धुमाकूळ घातला. शस्त्राचा धाक दाखवून दोन घरांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड असा 91 हजारांचा ऐवज लांबविला. चोरट्यांच्या दहशतीमुळे इसळक शिवारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अनिल सुधाकर खपके (वय 45 रा. खपके वस्ती, खारेकर्जुने रस्ता, इसळक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात अनोळखी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दरोडेखोरांची ओळख पटलेली नसून त्यांचा शोध एमआयडीसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून घेतला जात आहे.
शुक्रवारी रात्री अनिल खपके हे कुटुंबासह घरात झोपी गेले होते. शनिवारी पहाटे सव्वा एक ते सव्वा दोनच्या सुमारास सहा ते सात चोरट्यांनी अनिल यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांच्या हातात कुर्हाड, लाकडी दांडके, कटर होते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून घरातील 18 हजार 500 रुपयांची रोकड, 1.5 ग्रॅमचे सोन्याचे जोडवे, चार ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण, 15 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी व एक जाकिट असा 89 हजारांचा ऐवज चोरला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या रामकिसन वसंत खपके यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घराच्या कंपाउंडची तार तोडून व घराची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून घरातील सामानाची उचकापाचक केली. मात्र रामकिसन यांच्या घरात चोरट्यांना दोन हजारांची रोकड मिळून आली. दोन्ही घरांतून चोरट्यांनी 91 हजारांचा ऐवज चोरल्यानंतर ते पसार झाले.
सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक मोंढे, उपनिरीक्षक विनोद परदेशी, जाधव यांनी पोलीस अंमलदारांसह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.
परिसरात भितीचे वातावरण
चोरट्यांनी शस्त्रासह घरात प्रवेश करून मारून टाकण्याची भाषा केल्याने खपके यांनी सोन्याचे दागिने व रोकड लुटण्यास विरोध केला नाही. त्यामुळे चोरट्यांनी कोणाला मारहाण केली नाही. मात्र इसळक परिसरात अशी दरोड्याची घटना अलीकडच्या काळात घडली नव्हती. या दरोड्याच्या घटनेमुळे इसळक शिवारात वाडी वस्तीवर राहणार्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी होत आहे.