नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने नवा विक्रम केला आहे. इस्त्रोने आज सकाळी ६.२३ मिनिटांनी GSLV-F15 आकाशात प्रक्षेपित केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून NVS-02 सॅटेलाइला घेऊन जाणारे GSLV-F15 यान लाँच केले आहे. या तळावरुन उपग्रह प्रक्षेपित करणाऱ्या इस्रोचे हे १०० वे उड्डाण ठरले आहे.
सुमारे २० मिनिटांत उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेज असलेले जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल (GSLV) त्याच्या १७ व्या उड्डाणात नेव्हिगेशन उपग्रह NVS-2 वाहून नेला. नेव्हिगेशन उपग्रह NVS-2 हा नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (NAVIC) मालिकेतील दुसरा उपग्रह आहे. भारतीय उपखंडातील तसेच भारतीय भूमीपासून सुमारे १,५०० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रांमधील वापरकर्त्यांना अचूक स्थान, वेग आणि वेळेची माहिती प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.
GSLV-F15 मिशन यशस्वी झाल्यावर केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्त्रोचे कौतुक केले आहे. श्रीहरीकोटा येथून १०० वे ऐतिहासिक प्रेक्षपण झाले. यासाठी इस्त्रोला खूप शुभेच्छा. या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्यांच्यासोबत काम केले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. इस्त्रोने GSLV-F15 / NVS-02 मिशन यशस्वी करुन पुन्हा एकदा भारताचे नाव मोठे केले आहे.
NVS-02 उपग्रहाचे काम काय?
अमेरिकेच्या GPS प्रमाणे भारतीय उपखंडात स्वदेशी दिशादर्शक प्रणाली किंवा व्यवस्था कार्यरत व्हावी यासाठी २०११ पासून इस्रोने NavIC ( Navigation with Indian Constellation ) नावाने सात उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. या उपग्रहांमुळे लष्कराच्या विविध विभागांना आणि नागरी विमान सेवेकरता GPS प्रमाणे दिशादर्शन हे भारतीय उपखंडात केले जाते. याच उपग्रहांच्या प्रणालीत आता NVS-02 हा नवीन उपग्रह २०१६ ला पाठवलेल्या IRNSS-1E या उपग्रहाची जागा घेईल.
इस्रोप्रमुखांनी केला आनंद व्यक्त
१०० व्या मिशनच्या यशाबद्दल इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला. इस्रोचे अध्यक्ष म्हणून आपल्या पहिल्या मोहिमेबद्दल व्ही. नारायणन म्हणाले की, “२०२५ मध्ये इस्रोचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. NVS 02 उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. या मोहिमेचे १०० वे प्रक्षेपण हा एक मैलाचा दगड आहे.”
नारायणन यांनी शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखालील अंतराळ मोहिमेची आठवण केली. ते म्हणाले की, इस्रोने आतापर्यंत सहा पिढ्या प्रक्षेपण रॉकेट विकसित केली आहेत. याची पहिली पिढी सतीश धवन यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे त्याचे प्रकल्प संचालक होते. तेव्हापासून या १०० प्रक्षेपणांमध्ये इस्रोने ५४८ उपग्रह कक्षेत ठेवले आहेत. ज्यात परदेशी उपग्रहांचाही समावेश आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा