नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISRO ने नुकतीच त्यांची १०० वी रॉकेट मिशनची सुरूवात केली होती. या मिशनचे सगळ्यांकडून खूप कौतुक झाले होते. पण, आता याच मिशनबाबत एक वाईट बातमी येत आहे. २९ जानेवारीला इस्रोने NVS-02 उपग्रह लॉन्च केला होता. GSLV-Mk 2 रॉकेटद्वारे या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. पण आता NVS-02 उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यात अपयश आले असल्याचे इस्रोकडून रविवारी सांगण्यात आले असून ‘उपग्रह नेमून दिलेल्या ठिकाणी नेण्याच्या प्रक्रियेत अडचण आली आहे.
उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले होते. पण कक्षा वाढवण्याची जी प्रक्रिया असते, त्यात अपयश आले. NVS-02 उपग्रहातील थ्रस्टर्स प्रज्वलित होऊ शकले नाहीत, त्यासाठी उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थापित करता आले नाही, अशी माहिती इस्रोच्या वेबसाइवटर देण्यात आली आहे. थ्रस्टर्स प्रज्वलित होण्यासाठी आवश्यक असेलले ऑक्सीडायजरचे व्हॉल्व्ह उघडले नाहीत, हा उपग्रह यू आर राव उपग्रह केंद्राने तयार केला होता आणि तो जियोस्टेशनरी कक्षेत ठेवला जाणार होता. मात्र, त्याच्या लिक्विड फ्युएल इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याला आता नेमलेल्या कक्षेत पाठवण्यात अडचण येत आहे.
सध्या NVS-02 उपग्रह पृथ्वीभोवती GTO कक्षेत भ्रमण करत आहे. नॅव्हिगेशन सिस्टिमसाठी ही कक्षा उपयोगाची नाही. उपग्रहाची बाकीची सिस्टिम व्यवस्थित काम करतेय. त्याचे भ्रमण सुरु आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ या उपग्रहाचा आणखी काही उपयोग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्याचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे माहिती मिळविण्यासाठी करता येईल.
NVS-02 उपग्रहाचा उद्देश भारताची स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली, NavIC मजबूत करणे हा होता. १९९९ च्या कारगिल युद्धानंतर भारताने विकसित केलेली नाविक ही एक प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणाली आहे जी अमेरिकेच्या GPS प्रमाणे काम करते. कारगिल युद्धादरम्यान, भारताला अमेरिकेकडून उच्च-स्तरीय GPS डेटा मिळू शकला नाही, त्यानंतर सरकारने स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली तयार करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, बुधवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ६.२३ वाजता इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F15 रॉकेटद्वारे NVS-02 चे यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासाठीही हे मिशन महत्त्वाचे होते, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हे पहिले प्रक्षेपण होते. शिवाय इस्रोचे या वर्षातील हे पहिलेच मोठे मिशन आहे. मात्र, आता तांत्रिक बिघाडांमुळे मोहिम अयशस्वी ठरली आहे.