मुंबई | Mumbai
गेल्या पाच दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) जोरदार चर्चा रंगली आहे. कॉकरोच जनता पार्टीची स्थापना महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) या ३० वर्षीय तरुणाने केली आहे. धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी, आळशी हे त्याचे घोषवाक्य असून, या पक्षाने इन्स्टाग्रामवर भाजपच्या फॉलोअर्स संख्येला देखील मागे टाकले आहे.
अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) या मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचे खाते बनवले. त्यानंतर संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या ७२ तासांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंगवर आली आहे. या व्यंगात्मक राजकीय पक्षाच्या पेजला देशातील १०.४ मिलियनपेक्षा अधिक तरुणांनी फॉलो केले आहे.
तर इन्स्टाग्राम पेजच्या फॉलोअर्सची संख्या ११.८ मिलियनवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या भाजपच्या अधिकृत पेजपेक्षा जास्त झाली आहे. भाजपच्या अधिकृत पेजला फॉलो करणाऱ्यांची संख्या २६९ के आणि इन्स्टाग्रामला फॉलो करणाऱ्यांची संख्या ८७ लाख इतकी आहे. तर काँग्रेसचे १.३३ कोटी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आता या रेसमध्ये कॉकरोच जनता पार्टी पुढे जाताना दिसत आहे.
कोण आहेत अभिजीत दीपके?
मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रहिवासी असलेला अभिजीत दीपके हा एक प्रोफेशनल पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रेटेजिस्ट आहे. त्यानेच या पेजची सुरुवात केली आहे. अभिजीतने पुणे येथून पत्रकारितेमध्ये (जर्नलिज्म) आपले पदवी पूर्ण केली असून, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला होता. त्याने अमेरिकेच्या प्रतिष्ठित बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून ‘पब्लिक रिलेशंस’ (PR) मध्ये मास्टर ऑफ सायन्स (MS) चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
अभिजीतने सांभाळले आहे ‘आप’चे सोशल मीडिया हँडल
अभिजीत दीपके याला राजकीय संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा खूप जुना आणि दांडगा अनुभव आहे. वर्ष २०२० ते २०२२ दरम्यान तो आम आदमी पार्टीच्या (AAP) सोशल मीडिया टीमचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून कार्यरत होता. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘आप’च्या बाजूने सोशल मीडियावर जो मीम्सचा महापूर आला होता, त्यामागे अभिजीतचेच टॅलेंट असल्याचे मानले जाते. याशिवाय त्याने दिल्लीच्या शिक्षण विभागाचा कम्युनिकेशन्स ॲडव्हायझर म्हणूनही काम केले आहे.
सरन्यायाधीश काय म्हणाले होते?
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी १५ मे २०२६ रोजी ‘सिनिअर अॅडव्होकेट’ म्हणून मान्यता मिळण्यासंबंधीच्या वकिलाच्या एका याचिकेसंदर्भात बोलताना “काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे (कॉकरोच) असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात.” अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर या टिप्पणीवर न्यायाधीशांनी स्पष्टीकरण देतांना “ही टिप्पणी सर्वसामान्य बेरोजगार तरुणांसाठी नसून केवळ बनावट पदवी धारकांसाठी होती.” असे म्हटले होते. मात्र, तोपर्यंत सोशल मीडियावर तरुणांचा तीव्र आक्रोश आणि संताप भडकला होता.
अन् कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला
नीट (NEET) पेपर लीक आणि नोकरी न मिळाल्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या देशातील तरुणांचा हा राग अभिजीत दीपके याने अचूक ओळखला. यानंतर त्याने १६ मे २०२६ रोजी एक्स (X) वर मजेत एक पोस्ट लिहिली की, “काय होईल जर सर्व कॉकरोच एकत्र आले तर?” आणि त्याने तातडीने ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचे एक वेबसाईट आणि गुगल फॉर्म लाईव्ह करून दिला. त्यानंतर बघता बघता तरुणांनी याला डोक्यावर घेतले आणि एका व्यंगात्मक चळवळीची सुरुवात इंटरनेटवर झाली. सध्या या पार्टीला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत असून, झपाट्याने या पार्टीचे फॉलोअर्स वाढत आहेत. त्यामुळे आता ही पार्टी देशात नक्की नवीन काय क्रांती करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पार्टीमध्ये सामील होण्यासाठी काय आहेत अटी आणि पात्रता निकष?
अभिजितने या पक्षाच्या सदस्यत्वासाठी चार अटींवर पात्रता ठरवली आहे. यात पहिली म्हणजे बेरोजगारी, दुसरी म्हणजे आळस आणि निष्क्रिय राहणे, तिसरी म्हणजे ऑनलाईन राहण्याचे मोठे व्यसन आणि चौथी व्यावसायिकपणे भावना व्यक्त करण्याची क्षमता या अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटी आणि पात्रता निकष ठेवले आजच्या ‘जेन-जी’ (Gen-Z) तरुणांना कमालीचे आवडलेले दिसत आहेत.
कॉकरोच जनता पार्टीचा जाहीरनामा काय?
- कोणत्याही सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेची जागा किंवा अन्य राजकीय बक्षीस दिले जाणार नाही.
- नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणे हे दहशतवादासमान गंभीर गुन्हा मानला जाईल. कोणतेही वैध मत वगळल्यास संबंधित मुख्य निवडणूक आयुक्तांवर यूएपीए अंतर्गत कारवाई केली जाईल.
- संसदेत महिलांना ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्के आरक्षण दिले जाईल. तसेच सर्व कॅबिनेट मंत्रीपदांपैकी ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवली जातील.
- माध्यम स्वातंत्र्यासाठी अंबानी आणि अदानी समूहांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. तथाकथित ‘गोदी मीडिया’ अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.
- एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराला २० वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल.




