Saturday, April 11, 2026
Homeक्राईमAhilyanagar : आयटी कंपनीचा सोर्स कोड चोरीप्रकरण उघड

Ahilyanagar : आयटी कंपनीचा सोर्स कोड चोरीप्रकरण उघड

माजी कर्मचार्‍यांसह सॉफ्टवेअर कंपनीवर गुन्हा || सायबर पोलिसांकडून तपास सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात एका नामांकित आयटी कंपनीच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली असून, कंपनीच्या बौध्दिक संपदा हक्कांचा भंग करून सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी करून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीचे प्रतिनिधी नितीन गोपालदास भराडीया (वय 42, रा. पुणे) यांनी रविवारी (22 मार्च) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

सॉफ्टमेट सिस्टीम्स एलएलपी कंपनीचे मालक मंदार पाथरीकर व शैला केदार (दोघे रा. रामबाग कॉलनी, नवी पेठ, पुणे), तसेच कंपनीचे माजी कर्मचारी मुकुंद दायमा (रा. हिंजेवाडी, पुणे), जालींदर गमे (रा. खडकेवाडी रस्ता, काळेवाडी रहाटे, अहिल्यानगर), योगेश चव्हाण (रा. पिंपरी चिंचवड) व चैतन्य दिलीप जोशी (रा. सोलापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भराडीया हे गेल्या 11 वर्षांपासून पीआरएम सॉफ्ट सोल्युशन प्रा. लि. या कंपनीत प्रमुख धोरण अधिकारी (सीएसओ) म्हणून कार्यरत आहेत. सदर कंपनी 2013 पासून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करत आहे.

वित्तीय व्यवस्थापन, डीबीटी/एसएनए प्रणाली, पीएफएमएस इंटिग्रेशन तसेच विविध वेब व मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्याचा कंपनीला मोठा अनुभव आहे. ग्रामविकास विभागासाठी ‘एकात्मिक एकल पोर्टल’ (एसयूपी) ही महत्त्वाची प्रणाली कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने 2024 मध्ये विकसित केली होती. ही प्रणाली 1 एप्रिल 2025 पासून अधिकृतरित्या सुरू करण्यात आली होती. कंपनीने केलेल्या कामाचे बिल प्रलंबित राहिले तसेच बँकेकडून करार पूर्ण करण्यात विलंब होत असल्याने कंपनीने एप्रिल 2025 मध्ये एसयूपी प्रणालीची सेवा बंद केली होती. यानंतर बँकेकडून सोर्स कोड देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र कोणताही औपचारिक करार नसल्याने कंपनीने त्यास नकार दिला.

दरम्यान, सप्टेंबर 2025 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने एसयूपी प्रणालीसाठी 20 कोटी रूपयांची निविदा काढली. ही निविदा अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करण्याच्या अटींसह होती, ज्यामुळे संशय निर्माण झाला. कंपनीला या निविदेची माहिती देखील देण्यात आली नव्हती. ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बँकेने सादर केलेली प्रणाली ही मूळ कंपनीने विकसित केलेल्या एसयूपी प्रणालीसारखीच असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांना जाणवले. यानंतर कंपनीने अंतर्गत तपास सुरू केला. तपासादरम्यान काही माजी कर्मचार्‍यांनी कंपनीचा गोपनीय डेटा अनधिकृतपणे क्लाउड प्लॅटफॉर्म, ईमेल व बाह्य हार्डडिस्कव्दारे ट्रान्सफर केल्याचे उघड झाले. माध्यमांचा वापर करून सोर्स कोड बाहेर पाठवण्यात आल्याचे समोर आले. तसेच काही संगणकांमधील डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे सीसीटीव्ही व फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले आहे. सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना...

0
पंचाळे | वार्ताहर | Pnachale सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पंचाळे गावाजवळ (Panchale Village) आज (शनिवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास आयशर ट्रक आणि पिकअपच्या (Eicher trucks and...