Sunday, June 14, 2026
HomeनगरAhilyanagar : जलजीवन योजनांचा चेंडू आता ग्रामसभांच्या कोर्टात

Ahilyanagar : जलजीवन योजनांचा चेंडू आता ग्रामसभांच्या कोर्टात

सीईंओ भंडारी || ऑगस्ट महिन्यात होणार्‍या ग्रामसभांमध्ये सात विषय अजेंड्यावर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गेल्या काही वर्षापासून गाजत असलेल्या जलजीवन योजनेतील पूर्ण झालेल्या योजनांचे हस्तांतरण करून घेण्याचा विषय जिल्हा परिषद प्रशासनाने आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कोर्टात ढकलला आहे. जिल्ह्यात जलजीवनमध्ये पूर्ण झालेल्या योजनांचे हस्तांतरण करण्याची कार्यवाही संबंधित गावातील ग्रामसभेने करून घ्यावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यांत होणार्‍या ग्रामसभांमध्ये यावर कार्यवाही करून पूर्ण असणार्‍या जलजीवन योजनांचे हस्तांतरणाची प्रक्रिया करून घ्याची सुचना भंडारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना केली आहे. यासह अन्य महत्वाचे विषय होणार्‍या ग्रामसभांपुढे मांडण्यात येणार आहे. दरम्यान, कागदोपत्री पूर्ण, पाणी पुरवठा न होणार्‍या योजनांचे हस्तांतरण संबंधीत गावाने ग्रामसभेद्वारे करून घेतल्यास जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी संपणार असून आतापर्यंत आरोपीच्या पिंजर्‍यात असणार्‍या पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी या हस्तांतरण प्रक्रियेद्वारे संपणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते.

यंदा जिल्ह्यातील या ग्रामसभांमध्ये प्रामुख्याने सात विषय घेण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी काढले आहेत. यात पहिल्या क्रमांकावर जलजीवन विषय असून या योजनेत पूर्ण झालेल्या योजनांचे हस्तांतरण होणार्‍या प्रत्येक ग्रामसभेने करून घ्यावे, जिल्ह्यातील ग्रामपंचायती बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प करून त्यावर कार्यवाही करावी, वृक्ष लागवड कार्यक्रम प्रत्येक गावात यशस्वी करावा, नागरिकांना आपले सेवा सरकार केंद्रातून 30 शासकीय विभागातील 592 सेवाबाबत नागरिकांना माहिती देवून संबंधीत सेवा ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून द्यावी, घनकचरा विलगीकरण व सांडपाणी व्यवस्थापनबाबत प्रत्येक गावात विद्यार्थी व नागरिकांमध्ये जागृती करण्यात यावी, विकसीत महाराष्ट्र व्हीजन 2047 बाबत नागरिकांचे अभिप्राय नोंदवून घ्यावे, असे विषय जिल्ह्यात पुढील महिन्यांत होणार्‍या ग्रामसभांसमोर मांडण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

हा प्रकार म्हणजे हात झटकण्यासारखा
जिल्ह्यात जलजीवन योजनेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण झालेली नसतांना कामे पूर्ण दाखवण्यात आलेल्या आहेत. याबाबत अनेक बैठकांमध्ये गंभीर आरोप झालेले असतांना कामांची चौकशी करण्याऐवजी जिल्हा परिषदेने या योजनेतील पूर्ण झालेल्या कामांचे हस्तांतरण संबंधीत गावातील ग्रामसभांमध्ये करून घ्यावे, असे सांगणे म्हणजे हा एका प्रकारे जलजीवनच्या अपूर्ण कामाबाबत हात झटकण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या काही माजी सदस्यांनी नोंदवली आहे.

या अधिकार्‍यांवर ग्रामसभांची जबाबदारी
जिल्ह्यात ऑगस्टमहिन्यांत होणार्‍या ग्रामसभा त्या हजर असणारे शासकीय अधिकारी या ग्रामसभांचे सहनियंत्रण आणि त्या कधीपर्यंत घ्याव्यावत याबाबतच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी काढल्या आहेत. यात संबंधीत ग्रामसभेबाबत लेखी कळवणे, सभेचा अजेंडा काढून तो प्रसिध्द करणे, सभेसाठी संपर्क अधिकारी यांची नेमणूक करून विषयनिहाय मार्गदर्शक यांची नेमणूक करणे, जिल्हास्तरावरून तालुका संपर्क अधिकारी नियुक्त करणे व झालेल्या ग्रामसभांचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करणे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत हालचालींना वेग, दराडेंना धक्का देणार?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...