जळगाव | Jalgaon
जिल्ह्यातील अमळनेर-धुळे महामार्गावरील (Amlner – Dhule Highway) मंगरूळ गावाजवळ आज (मंगळवारी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात (Accident) घडला. कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गुजरातहून (Gujarat) आलेल्या एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याच्या दिशेने एसटी बस आणि एक दुचाकी आपल्या मार्गाने जात होत्या. याचवेळी धुळ्याकडून अमळनेरच्या (Amlner) दिशेने अत्यंत भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही कार समोरून येणारी एसटी बस आणि दुचाकीवर थेट जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील पाच प्रवाशांनीही घटनास्थळीच जीव गमावला.
दरम्यान, अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी (Citizen) तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि आपत्कालीन सेवाही घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातात एसटी बसमधील एका प्रवाशासह इतर काही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लहान मुलाला जीवदान
अपघातग्रस्त कारमध्ये अडकलेल्या एका चिमुरड्याला स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.
साखरपुड्याच्या आनंदावर विरजण
अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी होते. अमळनेर येथे आयोजित एका कौटुंबिक साखरपुडा समारंभासाठी हे कुटुंब आनंदाने प्रवासाला निघाले होते. मात्र अमळनेर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.




