टाकरखेडा | वार्ताहर | Takarkheda
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) अमळनेर तालुक्यातील (Amlner Taluka) टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह (Husbend and Wife) दोन लहान मुलांनी रेल्वेरुळावर झोकून देऊन सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज (गुरुवारी) पहाटे उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंब संपल्याने टाकरखेड्यासह संपूर्ण अमळनेर तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अमृत भिल (वय २६), पार्वती सुनील भिल (वय २४), सनी सुनील भिल (वय ६) आणि राज सुनील भिल (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हे कुटुंब घरातून बाहेर पडले. गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वेरुळावर जाऊन चौघांनी धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. हा प्रकार २७ तारखेच्या मध्यरात्री ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सकाळी ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
कष्टाळू कुटुंबाचा दुर्दैवी शेवट
सुनील भिल व त्यांच्या पत्नी पार्वती भिल हे रोजनदारी (मजुरी) करून अत्यंत प्रामाणिकपणे कुटुंबाचा गाडा चालवत होते. त्यांचा मोठा मुलगा सनी हा इयत्ता दुसरी तर धाकटा मुलगा राज हा अंगणवाडीत शिकत होता. या हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अचानक असा करुण अंत झाल्याने गावकऱ्यांचे डोळे पाणावले. या घटनेनंतर कुटुंबात आता केवळ सुनील यांची वृद्ध आई नवसारबाई या एकमेव हयात राहिल्या आहेत.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक (API) गणेश अहिरे, हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, विजय होईल, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. दरम्यान मृत महिला पार्वतीबाई यांच्या आई-वडिलांनी या मृत्यूबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत असून, आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अमळनेर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.




